कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पुणे :सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय व तत्परतेने सोडवणूक व्हावी या हेतूने विविध पातळीवर लोकशाही दिन आयोजित करण्यात येऊन नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यात येतात. विभागीय लोकशाही दिनामधे दाखल प्रकरणांवर सुनावणी घेऊन दिलेल्या आदेशाचे प्रशासनाने काटेकोरपणे व त्वरित पालन करुन तक्रारी तातडीने सोडवाव्या अन्यथा त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय सभागृहात विभागीय स्तरावरील लोकशाही दिनातील प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण, नगर पालिका प्रशासन उपायुक्त पूनम मेहता, करमणूक कर उपायुक्त निलीमा धायगुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक मुख्य अभियंता आर. वाय. पाटील यावेळी उपस्थित होते.

