कोल्हापूर न्यूज नेटवर्क
अरुण विठ्ठल माने हे कोल्हापुरात तब्बल ४० वर्षे कर सल्लागार म्हणून काम करत होते. सामाजिक बांधिलकी जपण्यामध्ये नेहमीच त्यांचा पुढाकार असत. त्यांना कोणतेच अपत्य नव्हते. पत्नी रेखा माने यांचे कोरोना काळात निधन झाले. तेव्हापासून त्यांनी आपली मालमत्ता समाजातील चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या उपयोगी पडावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे साडू पांडुरंग पाटील व कार्यालयीन सहकारी कृष्णात वीर यांच्याकडे त्यांनी त्यासंबंधीचे अधिकार दिले होते. त्यांनी बालकल्याण संकुलास मदत करण्यास प्राधान्य दिले. अरुण विठ्ठल माने यांचे २६ फेब्रुवारी २०२२ ला निधन झाले.
त्यानंतर सर्व प्रक्रिया करण्यासाठी कांही कालावधी गेला. पांडुरंग पाटील व कृष्णात वीर यांनी संपत्तीची विभागणी केल्यावर ती तपासण्यासाठी वकील अजित कुलकर्णी यांची माने यांनीच नियुक्ती करून ठेवली होती. त्यानुसार वकील अजित कुलकर्णी व कृष्णात वीर हे बालकल्याण संकुलात गेले.त्यांनी संस्थेची पाहणी केली. या संस्थेत अनाथ निराधार, मुला-मुलींचे व महिलांचे आयुष्य उत्तम पध्दतीने घडवले जात असल्याचे आणि आपण दिलेले पैसे तिथे योग्य कामासाठीच अत्यंत पारदर्शीपणाने वापरले जाणार असल्याचे पाहून त्यांना समाधान वाटले व याच संस्थेला निधी देण्याचा निर्णय त्यांनी सर्वानुमते घेतला. बालकल्याण संकुलातील एका कक्षास दिवंगत अरुण विठ्ठल माने यांच्या पत्नी दिवंगत रेखा माने यांचे नांव देण्यात येणार आहे. निधी प्रदान कार्यक्रमास अजित कुलकर्णी, कृष्णात वीर , संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, मानद कार्यवाह पदमजा तिवले उपस्थित होत्या.

