कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय मोठे ठेवून उत्तुंग भरारी घ्या , विशाल दृष्टिकोन ठेवा , कर्तबगारीसाठी सारं अवकाश खुणावत राहील असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.
डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन २०२४-२५ सालचा डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रशासकीय सेवा, समाजसेवा, राजकारण, कला, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना विद्यापीठाकडून सन २०२४-२५ सालचा डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव प्रदान करण्यात आला.
तसेच मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक, आदर्श सेवक, गुणवंत विद्यार्थी आदी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आमदार सतेज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राकेश कुमार शर्मा, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला.
हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरिया हॉल येथे रविवारी (एक सप्टेंबर) हा दिमाखदार सोहळा पार पडला.
श्री पाटील म्हणाले, डॉ. डी. वाय. पाटील यांनी मोठ्या शहरातील उच्च शिक्षणाच्या संधी ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचविल्या. शिक्षण संस्था सुरू केल्या. आज त्या शिक्षण संस्थेचा वेलू गगनावरी गेला आहे. डॉ. डी. वाय. पाटील व माझी जवळपास साठ वर्षाची मैत्री आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. सकाळपासून मी वेगळयाच भावविश्वात आहे. त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात मोठं कार्य केले. मोठं विश्व उभे केले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वारसा डॉ. संजय डी. पाटील पुढे चालवित आहेत. आईच्या नावांनी दरवर्षी एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती गरीब मुलांना देणे हे सामाजिक दायित्वाचं आदर्शवत उदाहरण आहे. यशवंतराव पाटील यानी कसबा बावडयात शाळा सुरू केल्या. त्यांच्या पुत्रांनी सुरू केलेल्या उच्च शिक्षण संस्थेचे आज वटवृक्षात रुपांतर झाल आहे. ए प्लस प्लस नामांकन मिळवलेले हे विद्यापीठ भविष्यात जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवेल. या विद्यापीठाचा विद्यार्थी आणखी नावारुपांनी बहरेल.
कुलपती संजय डी पाटील म्हणाले, माजी राज्यपाल डॉ. श्रीनवास पाटील यांना जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित करताना मन भरुन आले. संस्थेच्या उभारणीच्या टप्प्यात त्यांची मोलाची साथ लाभली. बहुआयामी हे व्यक्तिमत्व असून कर्तबगारीने फुलले आहे.
आमदार सतेज पाटील यांनी आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॅम्पससाठी श्रीनिवास पाटील यांची साथ लाभल्याचे कृतज्ञतापूर्वक सांगितले. मराठमोळया मातीत त्यांचे व्यक्तीमत्व फुलले. संस्थेच्या वाटचालीतील आजचा दिवस हा सुवर्णदिन आहे. संस्थेची वाटचाल ही प्रेरणादायी आहे. सगळया संकटावर मात करत संस्था उभी राहिली. या संस्थेचा विद्यार्थी असणे हे साऱ्यांसाठी अभिमानस्पद आहे इतका लौकिक डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने मिळवला आहे. समाजाच्या शैक्षणिक प्रगतीत या संस्थेचा वाटा आहे.

