जे चुकीचे काम करतात तेच माफी मागतात- राहुल गांधी

Kolhapur news
By -

      







कडेगाव :मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेल्या माफीवर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सडकून टीका करत  जे चुकीचे काम करतात, तेच माफी मागतात, असे  म्हंटले आहे.  काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी सहकार मंत्री पतंगराव कदम यांच्या कडेगाव येथील  पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. 

  

 

राहुल गांधी म्हणाले , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. मोदींनी माफी का मागितली याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे या पुतळ्याचे काम संघाच्या कार्यकर्त्याला कंत्राट देण्याचा त्यांना पश्चाताप असावा. त्यामुळे मोदींनी माफी मागितली असावी. दुसरे कारण म्हणजे पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार किंवा चोरी झाली असावी. कदाचित त्यामुळे मोदींनी माफी मागितली असावी. तिसरे कारण म्हणजे, त्यांनी महाराजांच्या सन्मानार्थ पुतळा उभा केला, पण ती फार काळ टिकला नाही म्हणून त्यांनी माफी मागितली असावी, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी यावेळी विश्वजीत कदम यांनी  स्वर्गीय पतंगराव कदम यांचा उभारलेला पुतळा 50-60 वर्षांनंतरही उभा राहील असा विश्वासही व्यक्त केला.


  राहुल गांधी म्हणाले , मी भारत जोडो यात्रेत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चाललो. मी एकटा नव्हे तर माझ्यासोबत लाखो लोक चालले होते. महाराष्ट्र, केरळ, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी सर्वच राज्यांतील लोक चालले होते. त्यावेळी माझ्या लक्षात आली की, भाजपचे लोक देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेष पसरवत आहेत. यात काही नवीन नाही. ते पूर्वीपासूनच असे करत आहेत. हीच लढाई इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी लढली होती. तीच लढाई आज काँग्रेस लढत आहेत. याच महापुरुषांची विचारधारा पाहिली तर त्याचे प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसते. पण भाजपच्या नेत्यांची संविधान संपवायचे आहे. त्यांनी सर्वच स्वायत्त संस्थांमध्ये आपले लोक घुसवले आहेत. 


--------------------------------------------------


महाराष्ट्राचे माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा कॉंग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या शुभ हस्ते आणि अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार साहेब, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मा. रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. खा. मुकुल वासनिक, माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे साहेब, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते मा. आ. बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ. नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री मा. आ. पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. आ. विजय वडेट्टीवार, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. जयंत पाटील, विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते मा. आ. सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


असंख्य नागरिकांच्या साक्षीने झालेला हा दिमाखदार हृदयस्पर्शी सोहळा अविस्मरणीय ठरला. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी अनेक विकास कामांच्या माध्यमातून पलूस-कडेगाव मतदारसंघासह सांगली जिल्ह्याचा कायापालट घडवून आणला. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांना त्यांच्या राजकीय वाटचालीत श्रीमती इंदिराजी गांधी, यशवंतरावजी चव्हाण, यशवंतराव मोहिते भाऊ, सोनियाजी गांधी आदींचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. स्व. डॉ. पतंगरावजी कदम साहेबांपासून कदम परिवाराचे कॉंग्रेस पक्ष व गांधी परिवाराशी घनिष्ठ व जिव्हाळ्याचे नाते कायम आहे. माननीय खा. राहुलजी गांधी हे देशाचे संविधान वाचविण्यासाठी लढा देत आहेत. केवळ सांगली जिल्हा व महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश या लढाईत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमास स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्यावर मनापासून प्रेम करणारे सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

------------------------------------------------