पुणे:महाराष्ट्रात नवीन समीकरण उदयास येत आहे. छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत इतर संघटना लवकरच महाराष्ट्रातील मतदारांना नवा पर्याय देत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. पुणे येथे छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिलाय का हे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. या 75 वर्षात नुसते हेवेदावे सुरू आहेत. महाराष्ट्र कसा घडवू शकतो?, महाराष्ट्र इतरांना दिशा देण्याचं काम करतो. सध्या लोक अस्वस्थ आहेत. लोकसभेत जनतेनं जो निर्णय दिला, त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. मागील 15-20 दिवसांत जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय घेऊन समोर येत आहोत. ज्यातून सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेन आमचा प्रवास सुरू झाला आहे.
ते म्हणाले, निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत, पुढची तारीख अजून जाहीर झाली नाही. जितके चांगले लोक आम्हाला जोडले जातील त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी, मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांशीही संवाद सुरू आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चांगला पर्याय महाराष्ट्रासमोर देणार आहोत. जरांगे पाटील सध्या सगळ्यांचा अंदाज घेतायेत. ते सकारात्मक निर्णय घेतील. महायुती, महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून आम्ही नवा पर्याय लोकांसमोर देणार आहोत.
महाराष्ट्रात नळावरची भांडणे सुरू आहेत
-राजरत्न आंबेडकर
या नवीन समीकरणावर राजरत्न आंबेडकर म्हणाले की, आज जे काही महाराष्ट्रात बघत आहोत, बाबासाहेबांचा इतिहास वाचला तर लहानपणी ते चाळीत राहायचे, रात्री 2 ते पहाटे 5 पर्यंत ते अभ्यास करत होते. कारण 5 वाजता पाणी यायचे, तेव्हा नळावरची भांडणे सुरू व्हायची. त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा. आज महाराष्ट्रात नेमकी तीच परिस्थिती आहे. नळावरची भांडणे सुरू आहेत. जोडेमारो आंदोलन, वैयक्तिक द्वेषातून हे सगळे सुरू आहे.
आंबेडकर पुढे म्हणाले की, लोकसभेत संविधान धोक्यात आहे असा प्रचार केला गेला, भारताचे संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिले. परंतु ज्यावेळी खरेच जेव्हा संविधानाला धोका आहे, मग वक्फ बोर्डाचा मुद्दा असो, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्न असो कुणीही एक प्रश्न विचारत नाही.
---------------------------------------------------

