विरेंद्र मंडलिक निवडणूक लढवणार नाहीत - संजय मंडलिक

Kolhapur news
By -

          



                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव विरेंद्र मंडलिक यांनी कागल विधानसभेला बंडखोरीची भाषा केली होती. त्यामुळे कागलमध्ये तिरंगी लढत होणार का ? अशी चर्चा रंगली होती. मात्र, आज  सोमवारी या चर्चेला खासदार संजय मंडलिक यांनी पूर्णविराम दिला. विरेंद्र मंडलिक यांची आम्ही समजूत काढली असून विरेंद्र मंडलिक उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, अशी माहिती संजय मंडलिक यांनी दिली.


  आज  सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक सुद्धा उपस्थित होते. संजय मंडलिक यांनी बोलताना सांगितले की, हसन मुश्रीफ लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील. कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीची एकी असून ठाकरे गटाच्या संजय घाटगे यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे, असेही संजय मंडलिक यांनी सांगितले.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरेंद्र मंडलिक यांनी मेळावा घेत हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यावर घणाघाती हल्लाबोल केला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये वडील संजय मंडलिक यांचे दोघांनी सुद्धा काम केलं नसल्याचा आरोप विरेंद्र मंडलिक यांनी केला होता. महायुतीने उमेदवारी आपल्याला द्यावी, हसन मुश्रीफ यांना प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका बसू शकतो, असेही त्यांनी म्हटले होते. कागल मतदारसंघात मंडलिक गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती.


त्यामुळे विरेंद्र मंडलिक कागलमध्ये बंडखोरी करणार का ? अशीच चर्चा रंगली होती. मात्र, आज मुश्रीफ अर्ज दाखल करत असताना संजय मंडलिक यांनीच विरेंद्र मंडलिक अर्ज भरणार नसल्याचे सांगत एक प्रकारे सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे आता कागलमध्ये खरी तुल्यबळ लढत ही हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये असणार आहे.

                  ----------------------