उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री तीन जणांनी गोळ्या घालून हत्या केली. झिशान सिद्दिकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्विकारली आहे. बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
सध्या फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यामागे बिश्नोई गँग असल्याचा दावा करण्यात आला आहे. बिश्नोई गँगमधील एका सदस्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या करण्यात आल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
फेसबुक पोस्ट मधील माहिती ....
ओम जय श्री राम जय भारत. मला जीवनाचा अर्थ माहिती आहे. मी शरीर आणि पैसा ही धूळ असल्याचे समजतो. मी जे केले ते चांगले काम होते. मी जे काही केले ते मैत्रीच्या धर्माचे पालन होते. सलमान खान आम्हाला ही लढाई नको होती. पण तू आमच्या भाईचे नुकसान केले आहे. आज बाबा सिद्दीकी किती चांगले होते, हे सांगितले जात आहे. पण एकेकाळी ते दाऊदसोबत मकोका कायद्याखाली होते.
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्यांचे बॉलीवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहारातील दाऊद आणि अनुज थापन यांच्याशी असलेले संबंध. आमची कोणासोबतही दुश्मनी नाही. पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल, त्याचा आम्ही हिशोब नक्की करु. आमच्या गँगमधील कोणत्याही भाईला मारण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही प्रतिक्रिया नक्की देऊ. आम्ही याआधी कधीही वार केलेला नाही. जय श्री राम, जय भारत, असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
-------------------------------------

