विरेंद्र मंडलिक यांचा कागल विधानसभा मतदार संघावर दावा

Kolhapur news
By -

  

            


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


कागल विधानसभा मतदारसंघातही शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव विरेंद्र मंडलिक यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. विरेंद्र मंडलिक यांनी शेंडूर येथील मेळाव्यात विधानसभा लढणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


मंडलिक गटाकडून आज कागल विधानसभा मतदारसंघातील शेंडूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी विरेंद्र मंडलिक यांनी  कागल मधून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्यावर  निशाणा साधत विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. हा मेळावा झलक आहे, पण कुणाला पिक्चर बघायचा असेल तर तो देखील दाखवू असे म्हणत विरेंद्र मंडलिक यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना खुले आव्हान दिले. कागलमधील नैसर्गिक जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे महायुतीत शिवेसेनेला जागा मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचे  वीरेंद्र मंडलिक यांनी सांगितले . 


   वीरेंद्र मंडलिक म्हणाले , समरजित घाटगे यांनी जनक घराणे आणि आताचे घराणे एकच आहे. तुम्हाला काय करायचे ते करा, असा निरोप कार्यकर्त्यांना दिला. मुश्रीफ साहेब यांनी देखील शाहू महाराजांना मदत करा, असे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले. लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी २० ते २२ दिवसांची वाट पहावी लागली. जे लोक तुतारीकडे गेले, त्यांच्यामुळे ही वाट बघायला लागली. स्वकीयांच्या वागण्यामुळे लोकसभेला आम्हाला फटका बसला. समजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांनी प्रामाणिकपणे काम न केल्यामुळे कागलमध्ये आमची लीड १४ हजारांवर झाली, असे म्हणत मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर या दोन्ही नेत्यांवर फोडले.

           

          मुश्रीफ साहेब आता थांबा... 

विरेंद्र मंडलिक यांनी या मेळाव्यात हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली. स्व. मंडलिक साहेबांनी जात पात न पाहता आपल्याला संधी दिली. तुम्ही पाच वेळा आमदार झाला. मात्र, आता तुम्ही थांबा. मंडलिक गटाचे उपकार फेडा हसन मुश्रीफ मागील २५ वर्षांपासून आमदार आहेत. त्यामुळे आता मतदारसंघात त्यांच्याबद्दल अँटी इन्कमबन्सी आहे. हसन मुश्रीफ नको, बाकी कोणी पण असू दे, असे कागल मतदारसंघातील लोक म्हणत आहेत, अशी टीका विरेंद्र मंडलिक यांनी केली.


------------------------------------------------