मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्यांदा आणि अख्ख्या मंत्रिमंडळाने एकदा भेट देऊन दर्शन घेतलेल्या कामाख्या देवीचे महात्म्य काय आहे

Kolhapur news
By -

 

        


       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुधवारी गुवाहाटीला जाऊन सहकुटूंब कामाख्या देवींचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा तिसरा गुवाहाटी दौरा आहे. यापूर्वी तर अख्खे मंत्रिमंडळ कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यामुळे या देवी विषयी अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. 

       

   कामाख्या देवळाच्या स्थापनेविषयी अनेक रोचक कथा  उपलब्ध आहेत. धार्मिक-पौराणिक साहित्यात हे देऊळ कामदेवाने विश्वकर्म्याच्या मदतीने बांधले असा संदर्भ सापडतो. सतीच्या आत्मदहनानंतर समाधिस्थित असलेल्या शिवाची समाधी भंग करण्यासाठी कामदेवाने मदनबाण चालवला.. परिणामत: समाधीभंग पावलेल्या शिवशंकराने आपल्या क्रोधाग्नीने कामदेवाला भस्म केले, तर नीलाचल पर्वतावर शक्तीच्या कृपेने कामदेवाला पुन्हा जीवनदान मिळाले म्हणून कामदेवाने येथे शक्तीसह शिवाची उपासना करून देऊळ बांधले अशी आख्यायिका आहे, म्हणून या क्षेत्राला कामरूप असेही म्हटले जाते.


     कामाख्या हे तांत्रिक सिद्धीचे सर्वोच्च सिद्ध शक्तिपीठ आहे. कालिका पुराणात या शक्ती पीठाच्या स्थापनेविषयी एक रोचक कथा देण्यात आली आहे, या कथेनुसार दक्षाच्या यज्ञात सतीने आत्मदहन केल्यानंतर, तिच्या विरहात व्याकूळ झालेल्या शिवाने उद्विग्न अवस्थेत तिचा निष्प्राण देह हातात घेऊन भ्रमण करायला सुरुवात केली होती, त्या वेळी भगवान शिवाला या मन:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी विष्णूने सुदर्शनचक्राने सतीचे शरीर भग्न केले होते, त्या भग्न झालेल्या तिच्या शरीराचे भाग पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडले, त्यात तिच्या योनीचा भाग हा आसाम या प्रदेशात पडला, तेव्हापासून हा प्रदेश शक्तिपीठ म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्या वेळी तिच्या योनीचा भाग या प्रदेशात ज्या पर्वतावर पडला त्या वेळी तो पर्वत निळ्या रंगात परिवर्तित झाला, म्हणून या पर्वताला नीलाचल पर्वत म्हणून ओळखले जाऊ लागले. या आख्यायिकेनुसार नीलाचल पर्वताला शिवाचेच रूप मानले जाते.


                 ------------------------