गुलाल उधळण्यास ,फटाके फोडण्यास व मिरवणूक काढण्यास उद्या असणार बंदी

Kolhapur news
By -

 

           



                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघाचा शनिवारी निकाल लागणार आहे. या निकालानंतर गुलाल उधळत विजयी मिरवणुका काढणार असाल तर सावधान, निकालानंतर गुलाल उधळणं, मिरवणुका काढणं, फटाके फोडणं, आरडाओरड करीत दुचाकी पळवणं हे तुम्हाला महागात पडू शकते.विधानसभा निवडृन निकालाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व प्रकार करण्यास मज्जाव करण्यात आला असून हा प्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यात या प्रकारांना बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. ढोल, ताशा, वाजंत्री, फटाके वाजवून जल्लोष करण्यास तसेच गुलाल उधळून शहरासह गावात मिरवणुका काढण्यासही मनाई करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेशच काढले आहेत.


कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा मतदार संघातील उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी निकालानंतरची विजयाची तयारी पूर्ण केली आहे. रॅली, गुलाल उधळणे, फटाके फोडणे यामुळे विजयी उमेदवार आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये वादावादी होवून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लेखी आदेश पोलीस अधीक्षकांना दिला आहे. त्यामध्ये निकालानंतर  रॅली-मिरवणुका काढणे, गुलाल उधळणे, फटाके फोडणे, दुचाकी फिरवणे या सर्व प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. असा काही जल्लोषाचा प्रकार आढळून आलेस संबधीतांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यात या प्रकारांना बंदी घालण्यात आली आहे.

              -----------------------

कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणी निकालानंतर कोणत्याही उमेदवाराने मिरवणुका, गुलालाची उधळण, फटाके फोडू नयेत, तशा सुचना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना द्याव्यात. शांततेत जो काही निकाल हाती पडेल तो स्विकारावा. आदेशाचे उल्लंघंण केल्याचे आढळून आलेस संबधीतांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश ज्या-त्या पोलीस ठाण्यांना दिले आहेत. 


महेंद्र पंडित : पोलीस अधीक्षक, कोल्हापूर.


       --------------------------------