कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास साजेसा भव्य हार, संपूर्ण पुतळ्याला शोभिवंत फुलांच्या माळांची आरास, पुतळा परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई, शिवकाल उलगडणार पोवाडा अशा शिवमय वातावरणात शिवाजी विद्यापीठाच्या प्रागंणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळा अनावरणाचा सुवर्णमहोत्सव दिन साजरा झाला.
या पुतळयाचे शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या नऊ कन्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ शनिवारी (३० नोव्हेंबर ) सायंकाळी दिमाखात झाला. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी संकलित व संपादित केलेल्या विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. जनसंपर्क कक्षाद्वारे निर्मित पुतळ्याची माहिती देणारी रील आणि १५ मिनिटांची लघुचित्रफीत यांचेही लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने कुलगुरू शिर्के यांच्या हस्ते झाले. या चित्रफीती नागरिकांना विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ (@ShivVarta) या युट्यूब वाहिनीवर पाहता येतील.
दरम्यान शिल्पकार बी.आर. खेडक यांच्या नऊ मुलींना या समारंभासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित केले. त्यांचा कुटुंबियांसह शाल, श्रीफळ व शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये सीमा शिर्के-खेडकर, प्रतिभा ओव्हाळे, शोभा राजे, उज्ज्वला राजे, जयश्री भालेराव, अंजली पाषाणकर, प्रविणा पुरेकर आणि तृप्ती पुरेकर यांचा समावेश राहिला.
याप्रसंगी बोलताना शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के म्हणाल्या, ‘ विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार आणि खेडकर यांच्या एकमेकांशी सातत्यपूर्ण चर्चेतून हे शिवरायांचे देखणे शिल्प साकार झाले. त्यावेळी हा पुतळा आशिया खंडातला सर्वात मोठा म्हणून गणला गेला. २०२६ हे बी.आर. खेडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने जानेवारी २०२५मध्ये शिवाजी विद्यापीठात शिल्पकला कार्यशाळा भरविण्याचा मानस आहे.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाची स्थापना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यामागील प्रेरणा सांगितल्या. कुलगुरू शिर्के यांनी, डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यासारख्या जाणकार इतिहासकाराची नजर आणि खेडकरांसारख्या कसलेल्या शिल्पकाराचे कसब यांचा संगम म्हणजे शिवछत्रपतींचा हा पुतळा आहे. येथून पुढे दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस या पुतळ्याचा अनावरण दिन म्हणून साजरा केला जाईल आणि त्या दिवशी पुतळ्याभोवती रोषणाई सुद्धा केली जावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. शाहीर डॉ. आझाद नायकवडी यांच्या पोवाड्यांनी वातावरण शिवमय झाले.
इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत केले. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार उपस्थित होते.
----------------------------

