कोल्हापूर न्यूज / वि .रा.भोसले
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरण शिगेला पोचले आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे.जे त्यांच्या हत्येला कारणीभूत आहेत त्यांना मोठी शिक्षा झालीच पाहिजे.यात वादच नाही.आमदार सुरेश धस यांनी ही बीड प्रकरणात त्यांचे विरोधक असलेले धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
धनंजय मुंडे हे अजित दादा पवार गटाचे आहेत.त्यांचे चारित्र्य धुतल्या तांदळासारखे आहे असे म्हणता येणार नाही.ते कांहीही असले तरी प्राजक्ता माळी यांचे नाव घेऊन भाजप आमदार सुरेश धस यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
परळीला मुंडेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्राजक्ता माळी गेल्या असतील.तसे अनेक महिला कलाकार राजकारण्यांच्या कार्यक्रमाला जात असतात.त्यांना त्याचे मानधन मिळते.रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य अभिनेत्री सुध्दा मुंडेंच्या कार्यक्रमाला गेली होती.मग प्राजक्ताचे काय चुकलं ?
राजकारणी नेत्यांनी महिला कलाकारांना सन्मानाने वागवलेच पाहिजे.प्राजक्ता माळी यांनी नेमके हेच मुलाखतीत सांगितले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिला सन्मान योजनेवर भर दिला आहे.तसे बिल पास झाले आहे.महिला आयोगाला तसे अधिकारही आहेत.असे असताना धस यांनी महिलांचा अवमान होणार नाही याकडे लक्ष द्यायलाच हवे होते.मयत देशमुख हे त्यांचे कार्यकर्ते होते.
"आमचा माणूस गेलाय.ज्याचे जळते त्यालाच कळते ."
असे त्यांनी उद्गार काढले.
मुंडे हे सुध्दा राजकीय नेते आहेत.दोघेही सत्ताधारी युती मध्ये आहेत.
एकमेकांची उणि दुणी काढायला त्यांना कोणी अडवलेले नाही.पण मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा अवमान करण्याचा त्यांना काय अधिकार ?प्राजक्ता माळीने नेमके याच मुद्याला अंगुली निर्देश केला आहे.
फुलवंती ही तिची नृत्य कलाकृतींचा प्रेक्षकप्रिय झाली आहे.कांहीं वेब सीरिज मध्ये सुध्दा ती काम करते.महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय विनोदी मालिकेत सुध्दा ती सूत्र संचालन करते.या मालिकेत काम करणाऱ्या अन्य कांहीं महिला विवाहित आहेत.मालिकेची गरज म्हणून त्या प्रणय दृश्ये ,संवाद यावर कसलेही आक्षेप घेत नाहीत.एवढेच नव्हे तर त्यांचे स्वतःची खरी नावे सुध्दा बदललेली नसतात. प्रेक्षकांनी सुध्दा त्यांच्यावर कसलाही आक्षेप न घेता मालिकेचा निखळ आनंद लुटला आहे.मग राजकारणी नेत्यांनी स्वतःच्या राजकीय हेतूसाठी महिलांना बदनाम करणे हा कितपत योग्य आहे ?
प्राजक्ताने अनेक दिवस सहन करून अखेर पत्रकार परिषद घेतली.मुख्यमंत्र्यांना सुध्दा सहकुटुंब भेटली.तिच्या साहसाचे कौतुक करायला हवे.
'सत्य भित्रे नसते .पाप भित्रे असते .'
हे तिने दाखवून दिले आहे.
निम्म्या लोकसंख्येची प्रतिनिधी म्हणून तू केलेल्या या साहसाला शत सलाम. महिलांच्या सन्मानासाठी तुझ्या पाठीशी राहणाऱ्या सर्वांना सलाम.
जय नारी शक्ती
--------------------------------------


