कोल्हापूर न्यूज नेटवर्क
" उत्तम शिक्षण देणे हीच पालकांची आपल्या पाल्याला मोठी भेट आहे . याहून जगात कोणतीही श्रेष्ठ भेट नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ बी . एम . हिर्डेकर यांनी केले . ते कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार , सेवानिवृत्त शिक्षक सन्मान व गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक व तज्ञ संचालक भरत रसाळे हे होते . तर मान्यवर पाहुणे म्हणून कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी आर .व्ही . कांबळे हे होते . मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला .
पतसंस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सभासदांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते . त्याचबरोबर विशेष कार्य करणाऱ्यांना हिरकणी पुरस्कार ,कै रणजीत पाटील कलाभिनय पुरस्कार प्रदान केले जातात व सभासदांच्या पहिली पासूनच्या पदव्युत्तर पर्यंतच्या सर्व पाल्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येते . अशा या संयुक्त कार्यक्रमांमध्ये बोलताना जेष्ठ शिक्षण तज्ञ डॉ बी एम . हिर्डेकर यांनी " 21वे शतक हे ज्ञानयुग आहे आणि शिक्षक हेच या शतकाचे शिल्पकार आहेत शिकवणे हे जन्म देण्यापेक्षा श्रेष्ठ दान आहे आणि हे ज्ञानदान शिक्षक जोपर्यंत चांगल्या पद्धतीने करत आहेत तोपर्यंत हा समाज सुसंस्कारित आणि विकसित होण्यास कोणतीच अडचण राहणार नाही असे प्रतिपादन करून .डॉ हिर्डेकर यांनी पतसंस्थेच्या सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहताना मनमोहन सिंग हे "सॉफ्ट पॉवर " चे प्रणेते ठरले आहेत .असे भावपूर्ण उदगार त्यांनी या प्रसंगी काढले .
पाहुणे म्हणून बोलताना प्रशासन अधिकारी आर . व्ही . कांबळे म्हणाले "दहा हजार पासून सुरुवात झालेली ही पतसंस्था 500 कोटीची उलाढाल आज करते . हे सर्व सभासद यांचा या पतसंस्थेवर असलेल्या विश्वासाचे द्योतक आहे . संस्थापक भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शी कारभाराने या संस्थेची घोडदौड चालू आहे ती अशीच बहरत राहो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या .
अध्यक्षपदावरून बोलताना संस्थापक भरत रसाळे म्हणाले "जागतिक कीर्तीचे अभ्यासू अर्थतज्ञ डॉ .मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे कोणत्याही पद्धतीचे उद्घाटन न करता डॉ .मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहून साधेपणाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे .डॉ . मनमोहन सिंग हे स्वतः ज्ञानी व शिक्षणाप्रेमी होते त्यामुळे त्यांच्या या प्रेरणेतूनच हा कार्यक्रम घेऊन त्यांना अभिवादन करण्यात येत आहे . जागतिक मंदीच्या काळात डॉ मनमोहन सिंग यांनी भारतावर कोणतेही आर्थिक अरिष्ठ येऊ न समर्थपणे हा देश पुढे नेला . त्यांच्या या कार्याची इतिहासात सुवर्णाक्षरांने नोंद होईल असे भावपूर्ण उदगार त्यांच्याबद्दल काढले .
पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे यांनी पतसंस्थेच्या कार्यक्रमाचा आढावा घेऊन अत्यंत चिकाटीने पारदर्शक कारभार करून या पतसंस्थेचा नाव लौकिक वाढवण्याची ग्वाही दिली .स्वागत संचालक साताप्पा कासार यांनी केले .तत्पूर्वी मनमोहन सिंग यांना सर्वांनी उभे राहून सभागृहात श्रद्धांजली वाहिली .यावेळी आदर्श शिक्षक , सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थी अशा तीनशे जणांना सन्मानित करण्यात आले व त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले . आभार पतसंस्थेचे व्हा . चेअरमन कृष्णात चौगुले यांनी मानले तर सूत्रसंचालन संचालीका वर्षाराणी वायदंडे व रोहिणी येडगे ,विद्या पाटील यांनी केले . या कार्यक्रमास संचालक सर्वश्री महादेव डावरे,सूर्यकांत बरगे , सर्जेराव नाईक ,शिवाजी सोनाळकर ,वसंत पाटील , अमित परीट ,राजेश कोंडेकर , संतोष आयरे ,राजेंद्र कोरे संभाजी सुतार , आप्पासो वागरे , दशरथ कांबळे ,व्यवस्थापक सदाशिव साळवी यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .
........................



