वाहनांवर प्रेस लिहून फिरणाऱ्यां बोगस पत्रकारांवर कारवाई करणार - जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित

Kolhapur news
By -

 

        


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   वाहनांवर प्रेस लिहून फिरणाऱ्यां बोगस पत्रकारांवर कारवाई करण्याची मोहीम दोन दिवसांत सुरु करणार असून, दोषी आढळल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. तसेच अशा बोगस पत्रकारांची नावे कळविणा-यांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.


  पत्रकार असल्याचे भासवून गैरप्रकार करणाऱ्या बोगस पत्रकार, संस्थांवर कारवाई करा अशी मागणी  कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे करण्यात आली , त्यावेळी त्यांनी  शिष्टमंडळास अशी ग्वाही दिली. 


   निवेदनात म्हंटले आहे, कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पत्रकारितेशी संबंधीत नसलेल्या व्यक्ती व संस्थाकडून पत्रकार असल्याचे भासवून सर्वसामन्य नागरिक तसेच शासकीय यंत्रणेची सर्रास दिशाभूल केली जात आहे. पत्रकारितेतील शैक्षणिक पात्रता तसेच पत्रकारितेचे कसलेही ज्ञान नसलेल्यांकडून पत्रकारितेच्या नावाखाली त्यांचे गैरहेतू साध्य करण्याचे प्रमाण चिंतनीय आहे.


    बाजारात बेकायदेशीर मिळणारे प्रेस/पत्रकार शब्द लिहिलेल्या लेस, तसेच पत्रकार म्हणून ओळखपत्र गळ्यात लटकवून, वाहनांवर ठळक अक्षरात प्रेसचे लेबल लावून अनेकजण फिरत आहेत. पत्रकारितेच्या नावाखाली अशा काही टोळ्यांकडून लुबाडणूक सुरु असल्याचा प्रत्यय नुकत्याच पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून समोर आला आहे. त्यामुळे पत्रकारितेची होणारी बदनामी तसेच पत्रकारितेच्या नावाखाली सुरु असलेला गैरवापर करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, सुखदेव गिरी, समीर मुजावर, समीर देशपांडे, दुर्वा दळवी, रवि कुलकर्णी, पांडूरंग दळवी, बाळासाहेब पाटोळे, दीपक जाधव, पी.ए.पाटील, महेश कांबळे आदी उपस्थित होते.

    ---------------------------------------------------

 

   वाहनांवर बेकायदेशीर प्रेस लिहिणाऱ्यांची वाहने जप्त करा


   पत्रकार असल्याचे सांगून जर शासकीय, निमशासकीय खाजगी कार्यालयात वा कोणाकडे पैशाची व अन्य वस्तूची मागणी होत असेल तर संबंधितांची सखोल चौकशी करून  त्याच्यावर व त्यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर खंडणीसह संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल करावा. वाहनांवर बेकायदेशीरपणे प्रेस, पत्रकार लिहिणाऱ्यांवर सुद्धा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत संयुक्त कारवाई करावी प्रसंगी दोषींची वाहने जप्त करावी अशी मागणी करण्यात आली.


      ---------------------------------------------------


         आता शासकीय कार्यालयांमध्ये यादी


कोल्हापुरातील प्रत्येक शासकीय कार्यालयात कोल्हापूर प्रेस क्लब पत्रकारांची यादी देणार आहे. त्याद्वारे अधिकृत कोण व बोगस कोण हे ओळखता येणे शक्य होईल. जर असे बोगस पत्रकार आढळले तर त्यांनी त्वरित पुराव्यासह कोल्हापूर प्रेस क्लबशी वा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहन अध्यक्ष शीतल धनवडे यांनी केले. 


--------------------------------------------------------