नववीची प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी २१ युटयुब चॅनलवर पोलिसात गुन्हा दाखल

Kolhapur news
By -

                    


पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी (पॅट) परीक्षेतील नववीची प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी पोलीसांनी २१ युटयुब चॅनलचे विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एससीईआरटीच्या संचालक संगीता प्रभाकर शिंदे (वय- ५०रा. हडपसर, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.


नॉलेज गंगा, अनिकेत, ए.ए. क्लासेस, प्रशांत वारे आर्टिस्ट, झेन झेड लर्निंग बाय एम_आर, एचटी स्टडी २.०, लर्न विथ अनु २१, @ सेमी मराठी क्लास, भाषणमित्रा, आर. डी. क्लब, एस. बी. सूरज क्रिएशन, एम. एच. एज्युकेशन, वाय. सी. एज्युकेशन महाराष्ट्र, शिवस्तुती रायटिंग, स्कॉलरशिप स्टडी, मी गुरुजी, एम. एच. स्टडी, स्टडी टाइम, स्टडी पार्टनर या चॅनेल्स विरोधात राज्य शैक्षणिक परिषद यांनी तक्रार दाखल केली आहे.


पॅट परीक्षेचा पेपर हा परीक्षा होण्यापूर्वीच सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. एससीईआरटीईकडून स्टार्स उपक्रमा अंर्तगत राज्यात इयत्ता तिसरी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात येते. ही परीक्षा यंदा ८ ते २५ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार एससीईआरटीने प्रश्नपत्रिका तयार करुन ती राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाचे शाळा, शासकीय शाळा, खासगी अनुदानित शाळा यांना पाठवलेली होती. परंतु या प्रश्नपत्रिके बाबत कोणत्याही प्रकारची गोपनीयता न बाळगल्याने सोमवारी मराठी विषयाची इयत्ता नववीची प्रश्नपत्रिका सोशल मिडियावर व्हायरल झाली. ही प्रश्नपत्रिका दाखवत ती सोडविण्याबाबतचे मार्गदर्शन संबंधित २१ युट्युब चॅनलवर दाखविण्यात आले. त्यामुळे याबाबत एससीईआरटीकडून पोलीसांत रितसर लेखी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची कोणतीही परवानगी न घेता परस्पर परीक्षेच्या  प्रश्नपत्रिका प्रसारित करून आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल केला आहे . 


   -----------------------------------