कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पारंपारिक पद्धतीने ऊस शेती करुन उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही. प्रगत तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एआयसारख्या तंत्रज्ञानाद्वारे ऊस शेतीत ५० टक्के उत्पादनात वाढ झाल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी आता एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन राज्य साखर संघाच्या संचालिका व शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजनाअंतर्गत विविध योजनेतील लाभार्थी सभासद शेतकऱ्यांना अनुदान चेक वाटप कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. कारखान्याच्या विविध ऊस विकास योजनांत सभासद शेतक-यांनी सक्रिय सहभाग नोंदवून अनुदानाचा लाभ घेतला.
सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास व कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून घाटगे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, संचालक सचिन मगदूम, शिवाजी पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, इंदूबाई झांजगे आदी उपस्थित होते.
----------------------------