बकऱ्यांचा कळप ते भारतीय पोलिस सेवा : यमगे गावच्या बिरुची प्रेरणा दायक गरुड झेप.

Kolhapur news
By -

 

            


          कोल्हापूर न्यूज  /  वि.रा.भोसले


"बिरू, आता बास झालं वाचायचं . रानभर  मेंढरं पसरल्यात .

ती आवराया लागतील.रात रानातच काढायची हाय."

  "बाबा ,आलो आलो. झालंच माझं वाचून."

 "आरं ,काय वाचतोस एवढं ? "

 "बाबा, हे आय पी एस हाय."


     "मला त्यातलं काय कळत न्हाई.मेंढर वळवायचं काय हाय काय त्यात ? "


   "न्हाई बाबा,माणसं वळवायचं हाय."


     बाप लेकांचा ग्रामीण भाषेतला हा संवाद कांहीं काल्पनिक नाही.


  यमगे ता.कागल येथील डोणे  कुटुंबातील बिरू मेंढरं राखत आता भारतीय पोलिस सेवेत (IPS) दाखल झाला आहे.


    चंद्रमौळी झोपडीतल्या प्रांगणातून बिरुने थेट आकाशीची गरूड झेप घेतली आहे.


     त्याच्या भोळ्या भाबड्या आई वडिलांना सुद्धा माहिती नव्हतं की बिरू रात्रंदिवस कसला अभ्यास करतोय.वैतागून बाबांनी म्हटलं .

 "आता बास झालं मेंढरं राखायचं . एखादी नोकरी बघ म्हणजे सकाळ संध्याकाळच्या जेवणाची तरी सोय होईल."


    खडतर आयुष्याचे असे चटके झेलत बिरुने आयपीएस परीक्षा पास केली आहे. 

     त्याचे प्राथमिक शिक्षण यमगे गावच्या शाळेत व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण  मुरगूडच्या शिवराज विद्यालयात झाले.

    गरिबी म्हणजे कांहीं शाप नव्हे तर ते एक आव्हान आहे असे मानून त्याने अत्यंत चिकाटीने यू पी एस सी या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.भारतात ५५१ व्या क्रमांकाने तो आय पी एस परीक्षा उत्तीर्ण झाला.

     ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बिरू म्हणजे एक प्रेरणा स्थान आहे.


   बिरू सारखी आणखी  कांहीं ग्रामीण मुले यू पी एस सी  व एम पी एस सी मध्ये चमकली आहेत.


    शिंदेवाडीचा राजेंद्र जालीमसर एम पी एस सी झाला. सोळांकुरची शीतल करणे सुद्धा आय ए एस झाली .

     ग्रामीण विद्यार्थ्यांची ही प्रेरणास्थाने म्हणावी लागतील.

   ध्येयाच्या मार्गावरील बिरूचा हा अफलातून प्रवास म्हणजे यमगे गावच्या किर्तीत खोवलेला एक मानाचा शिरपेच होय.

    त्याच्या या ध्येयवादाचे वर्णन एकाच पंक्तीत करता येईल.


**तमसो मा ज्योतिर्गमय**


 अंधारातून प्रकाशाकडे


---------------------------------












    केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा मध्ये  महाराष्ट्राच्या पुणे शहरातील अर्चित डोंगरे याने देशात तिसरा व महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवून राज्याचे नाव उज्वल केले आहे.

अर्चितची ही घवघवीत कामगिरी त्याच्या सातत्य, कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाचे फलित आहे.अशा प्रेरणादायी वाटचालीतून असंख्य तरुणांना योग्य दिशा व मार्गदर्शन  मिळेल अशी खात्री आहे.


 -----------------------------