कोल्हापूर न्यूज नेटवर्क
फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) मध्ये कोकण विभागाने, विभागीय मंडळ स्थापनेपासून म्हणजे सन २०१२ पासून प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. चालू वर्षी कोकण विभागीय मंडळाचा निकाल 98.82% इतका आहे. मागील वर्षी 99.01% निकाल होता. निकालात 0.19 इतकी किंचितशी घट झाली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याने 99.32% निकालासह राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
कोल्हापूर विभागीय मंडळाने 96.87% निकालासह राज्यात द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. मागील दहा वर्षांचा विचार करता (सन 2021 चा अपवाद वगळता) कोल्हापूर विभाग द्वितीय क्रमांकावर आहे. मागील वर्षी कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल 97.45% इतका होता. निकालात 0.58% इतकी किंचितशी घट झाली आहे.
कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले. बारावी प्रमाणे दहावी मध्ये दोन्ही मंडळांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
राज्यात निकालात व कॉपीमुक्त अभियानात कोकण व कोल्हापूर विभाग अव्वल आहे. कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त अभियान जोरकसपणे राबविण्यात आले. कोल्हापूर विभागात तर डिसेंबर 2024 पासूनच मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.
"राज्यस्तरावरून वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व प्रेरणा, विभागीय मंडळ स्तरावरील सर्वांचे परिश्रम, जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांचे सहकार्य, शाळा, महाविद्यालयाकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद यामुळे कोकण व कोल्हापूर मंडळ अव्वल स्थानी आहे".
- राजेश क्षीरसागर,
विभागीय अध्यक्ष,
कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ.
-----------------------------