कोल्हापूर न्यूज / वि. रा. भाेसले
बेनाडी तालुका निपाणी या छोट्या गावातील इंग्रजी विषयाचे शिक्षक.गाव कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले .गरीब शेतकरी म्हणण्यापुरती गुंठ्यातली जमीन.शिक्षणासाठी कोणाचा पाठिंबाही नाही.
बालकृष्णने गाव सोडले.निपाणीतील देवचंद कॉलेजचे प्रा.भालेराव यांचे चरण स्पर्श करून आयुष्याला सुरुवात केली.भालेराव सर हे स्वामी विवेकानंदांचे निस्सिम भक्त आणि ब्रह्मचारी. स्वामीजींच्या चैतन्यदायी विचाराने अनेकांची आयुष्ये त्यांनी बदलून टाकली.
बालकृष्णने शिवाजी विद्यापीठातील कमवा आणि शिका या योजनेतून शिक्षणाला सुरुवात केली.अमेरिकेत नरेंद्रनी भगव्या वस्त्रात माधुकरी मागून दिवस काढले होते.हा आदर्श समोर होता.
बालकृष्णने इंग्रजीत एम ए केले .बी एड केले .नोकरीचा शोध सुरू झाला. इंग्रजी विषय असल्याने लगेच नोकरीही मिळाली. बाळकृष्ण आता खामकर सर म्हणून ओळखले जाऊ लागले.
कागल तालुक्यातील मळगे विद्यालय व ज्युनियर कॉलेज मळगे बुद्रुक या शाळेत ३३ वर्षे इंग्रजी अध्यापनाचे काम केले. शेवटची ३ वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केले.
इतक्या दीर्घ सेवेत त्यांनी शिक्षकांच्या अनेक समस्या सोडवण्याकरिता अविरत कार्य केले. त्यासाठी आंदोलने,शिबिरे,चर्चा सत्रे यात भाग घेतला .शिक्षक संघटनेचे नेते बी.डी पाटील यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले.समतोल विचार व संयमी वृत्ती या मुळे कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली.
सामाजिक कामात सुद्धा ते आघाडीवर राहिले. समाजवादी प्रबोधिनी मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मुरगूडमध्ये ३० वर्षे चालवली.महाराष्ट्रातील.नामवंत विचारवंताची प्रभावी भाषणे मुरगूडच्या रसिक श्रोत्यांना ऐकायला मिळायची. प्रबोधिनीचे इतरही उपक्रम त्यांनी राबवले.गरीब कुटुंबांना दिवाळीला कपडे व फराळ वाटप ,पडक्या भिंतींची बांधकामे यासाठी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन ते झटत राहिले.हे सगळं सायकलवर फिरून त्यांनी केले. मुरगूडच्या रोटरी क्लबचे अध्यक्षपद पण त्यांनी भूषविले.
आज दोन्ही मुले इंजिनिअर आहेत.एक फॉरेन रिटर्न आहे.मुलगी ही फार्मसी झाली.पत्नी प्राचार्य म्हणून निवृत. दुचाकी ते चारचाकी.झोपडी ते प्रशस्त बंगला ही वाटचाल त्यांनी कष्टातून केली आहे.विनम्र व हसरा स्वभाव हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आभूषण आहे.त्यांच्या या कार्याचा गौरव नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.
शिक्षकी सेवा सांभाळत सामाजिक सेवेला सुध्दा त्यांनी एक वेगळा आयाम दिला आहे.
---------------------------