मुलांना शाळेत झोपू देणारी पुणे जिल्हा परिषदेची शाळा : जागतिक स्तरावर शाळेची नोंद

Kolhapur news
By -

            



    पुणे : जेवणाच्या सुटीनंतर इथे मुलांसाठी योगनिद्रा घेतली जाते.मधली सुट्टी झाली, डबे खाऊन झाले तरी पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या एका सरकारी शाळेत विद्यार्थ्यांचा गोंगाट ऐकू येत नाही. कुणी आपल्याच हाताची उशी करून त्यावर डोकं टेकवलेलं असतं, तर कुणी दप्तरात आणलेलं पांघरूण अंगावर घेऊन जमिनीवर शांतपणे पहुडलेलं असतं.


वर्गाच्या बंदिस्त भिंती आणि बाकांची शिस्त नसलेल्या कण्हेरसर गावाजवळच्या या शाळेतली मुलं दररोज डब्बा खाल्ल्यानंतर चक्क अर्धा तास झोपतात.ही शाळा आहे ,पुणे जिल्ह्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.


दुपारची झोपच नाही, तर या शाळेत इतरही अनेक वेगवेगळे उपक्रम चालतात. सृजनशील कल्पनांची, वेगवेगळ्या प्रयोगांची आणि शिक्षणाच्या नव्या शक्यतांची ही शाळा आहे.


म्हणूनच 'टी फोर एज्युकेशन' या लंडनमधल्या संस्थेनं घेतलेल्या जागतिक पातळीवरील सर्वोत्तम शाळेच्या स्पर्धेत जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं पहिल्या दहामध्ये स्थान मिळवलं आहे.


काही वर्षांपूर्वी बंद पडण्याच्या मार्गावर असलेली ही शाळा, आता जागतिक पातळीवर झळकणारी राज्यातली सरकारी शाळा ठरली आहे.


जगभरातल्या शेकडो शाळांमधून जालिंदरनगरच्या या शाळेची निवड झाल्याचं, शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे सर सांगतात. बुधवारी म्हणजेच 18 जूनला या स्पर्धेचा निकाल लागला.


स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात ऑनलाईन मतदानाद्वारे या दहा शाळांमधून सर्वोच्च शाळा निवडली जाईल. जिंकणाऱ्या शाळेला एक कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.


'लोकांच्या आधारासोबतच एखादी शाळा मुलांना मुलांना हवी असणारी मोकळीकता देऊ शकली तर किती प्रगती होते हेच जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेच्या यशातून दिसून येतं.'


मुलांना हवी असणारी मोकळीकता दिली तर ते किती बहरू शकतात, हेच या सरकारी शाळेच्या यशातून दिसून येतं.

शाळेत मुलांना एक तास जेवायची सुट्टी असते. त्यातल्या अर्ध्या तासात मुलं जेवतात आणि उरलेला अर्धा तास योगनिद्रा करतात.


"खेडेगावात शेतकरी पहाटेपासून काम करतात. दुपारच्या जेवणानंतर काही वेळासाठी अंग टाकतात. त्या छोट्या विश्रांतीतही मन, मेंदू आणि शरीर यांना चांगल्याप्रकारे आराम मिळतो," असं मुख्याध्यापक सांगतात. ते 'वारे गुरूजी' या नावाने प्रसिद्ध आहेत.


मुलांना योगनिद्रेसाठी स्पीकरद्वारे सूचना दिल्या जातात. सोबत हळूवार संगीतही सुरू असतं. काही मुलं अर्धवट झोपेच्या स्थितीत जातात. काहींचं शरीर झोपतं, पण मेंदू जागा राहतो. तर काही मुलांना खरंच झोपही लागते.


"अशा स्थितीत 25-30 मिनिटं घालवल्यानंतर मुलं उठतात तेव्हा ती अतिशय तरतरीत झालेली असतात. त्यांच्या मेंदूवरचा थकवा निघून गेलेला असतो आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर मेंदूची शिकण्याची जितकी तयारी असते ती परत येते," असं वारे गुरूजी सांगतात.

अुर्धा तास संपला तरी मुलं जाग आल्यावर उठतात आणि अवांतर वाचनाच्या तासासाठी आवडीचं गोष्टीचं पुस्तक घेऊन वाचत बसतात.

शाळेत वेगवेगळ्या इयत्तेसाठी वेगवेगळे वर्ग, मुलांना बसण्यासाठी बाक असं काहीही नसल्यानं मुलांना जमिनीवर आरामशीर आडवं होऊन किंवा झाडाखाली पडूनही वाचता येतं.

शाळेची इमारत मुलांना आवडेल, आपली वाटेल अशीच तयार करण्यात आल्याचं, वारे गुरूजी सांगतात. शाळेला सिमेंटच्या भिंती नाहीत. तर, सरकवून उघडता येतील अशी काचेची दारं आहेत.


"आम्हाला आत बसल्यावर बाहेरचं मोकळं आकाश दिसलं पाहिजे, ही मुलांची इच्छा विचारात घेऊनच शाळेची इमारत बांधण्यात आली आहे. शिवाय, वाटेल तेव्हा जमिनीवर आणि वाटेल तेव्हा वर असं बसण्याची सोय हवी असंही मुलांनी सांगितलं होतं," असं वारे गुरूजींचे म्हणणे आहे.

त्यामुळेच बाकं न बसवता, शाळेच्या आत काही ठिकाणी पायऱ्या तयार केल्या आहेत.

सकाळी 9 च्या सुमारास शाळा भरली की, सगळे मुलं-मुली मिळून शाळेची स्वच्छता करतात. हातात झाडू घेऊन अंगण झाडणं, काचेची दारं पुसून घेणं, हायड्रोपोनिक पद्धतीनं लावलेल्या झाडांची काळजी घेणं आणि शिक्षकांच्या देखरेखीखाली शाळेतील संडास-बाथरूम साफ करणं अशी सगळी कामं मुलं एकत्र मिळून करतात.


शाळेची जबाबदारी मुलांचीच असावी यासाठी त्यांचं एक मंञीमंडळही स्थापन करण्यात आलंय. त्यातून मुलांकडे आरोग्यमंत्री, सफाईमंत्री, शिक्षणमंत्री, अन्नपुरवठा मंत्री अशा भूमिका दिल्या गेल्यात.

शाळेबद्दलचे निर्णय घेण्याची, काही ठराव पास करण्याचं काम या मंत्रिमंडळांच असतं. त्यांच्या सूचना शिक्षकांनाही लागू असतात.


      मुलंच होतात मुलांचे शिक्षक


जालिंदरनगर जिल्हा परिषदेत शाळेत मुलंच मुलांचे शिक्षकही होतात. शिक्षक शिकवतायत आणि मुलं लिहून घेतायत असं चित्र या शाळेत कधीही दिसत नाही.

मोठ्या वर्गातल्या काही मुलांना विषयमित्र म्हणून नेमलं जातं. त्या विषयमित्रासोबत चार-पाच मुलांचा एक गट जोडून दिला जातो. हा विषयमित्रच त्यांना शिकवतो.

"आमच्या 28-29 वर्षांच्या अनुभवातून आम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे. ती म्हणजे मुलं शिक्षकापेक्षा मुलांकडून अधिक चांगल्या पद्धतीनं शिकतात," अशी या संकल्पनेमागची भूमिका वारे गुरूजी स्पष्ट करतात.


         मुलांचं ऐकायला हवं


याचाच परिणाम म्हणून शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. 2022 मध्ये शाळेची पटसंख्या 3 होती. मात्र, 2025-26 या वर्षात शाळेत जवळपास 150 विद्यार्थी आहेत.


"माझा मोठा मुलगा एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात होता. पण इथली शिक्षणपद्धती आवडल्यानं मी मुलाला या शाळेत टाकलं," असं थिटेवाडी गावाजवळ हॉटेल चालवणारे योगेश करडे म्हणणे आहे.


इथं आल्यापासून मुलात खूप बदल झाले असल्याचं त्यांना जाणवतं. "अभ्यासक्रमापलिकडचं बरंच काही त्याला कळायला लागलंय. जगाचं शहाणपण येत आहे," असं ते म्हणाले. मोठ्या दादाचं पाहून त्यांची लहान मुलगी अंगणवाडीत न जाता या शाळेतच येऊन बसते. तिच्यासारखी अंगणवाडीतली आणखीही काही मुलं शाळेत आहेत.



      ----------------------------