कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथील कावळेसाद परिसरात गेलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी राजेंद्र बाळासाहेब सणगर यांचा मृतदेह शनिवारी सापडला. कावळेसाद दरीत दोनशे फूट खोल अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. एनडीआरएफचे पथक व गेळे ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
सणगर हे शुक्रवारी मित्रांच्या सोबत वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे गेले होते. जिल्हा परिषदेतील आठ कर्मचारी व इतर मित्र मिळून असे चौदा जण सोबत होते . शुक्रवारी ते कावळेसाद पॉईंट येथे फिरत असताना रेलिंग वरून पाय घसरला. पाय घसरून ते दरीत पडले. शुक्रवारी संध्याकाळी त्यांची शोधाशोध करण्यात आली. दाट धुके ,अंधार यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शोधकार्य थांबवले होते. शनिवारी सकाळी पुन्हा शोध कार्याला सुरुवात झाली. एनडीआरएफचे पथक व गेळे ग्रामस्थ यांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. दरीत दोनशे फूट अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. दरम्यान सणगर यांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त कळताच कोल्हापुरातून त्यांच्या मित्रपरिवाराने तिकडे धाव घेतली.
---------------------------------