कोल्हापूर न्यूज नेटवर्क
छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची माहिती आणि त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावेत, या हेतूने कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये, म्हणजेच शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक वास्तूमध्ये, होलोग्राफिक शोमधून राजर्षी शाहू महाराजांना जवळून अनुभवता येणार आहे.
शासनाच्या वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून, या उपक्रमांतर्गत पहिल्यांदाच होलोग्राफिक शोद्वारे शाहू महाराज लोकांशी संवाद साधताना पाहायला मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विकास निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रयत्नातून या योजनेला गती मिळाली आहे.
होलोग्राफिक शोमध्ये शाहू महाराजांनी आपल्या जीवनकाळात दिलेली निवडक व महत्त्वाची भाषणे घेण्यात आली असून, त्यांचे सादरीकरण आधुनिक होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शोमध्ये वापरलेले पेहराव त्या काळातील मूळ वेशभूषेच्या आधारे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना इतिहासाचा एक सजीव अनुभव मिळतो.
याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ जयसिंगराव पवार, इंद्रजीत सावंत आणि वसंतराव मुळीक, उदय सुर्वे, अर्चना पाटील उपस्थित होते.
----------------------