कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजानाच असून या परिसरात पर्यटकांना सोबतच वर्षाविहारासह जंगल, जल, जमीन, शेती पाहण्याचे पॅकेजच मिळत आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून या ठिकाणचा नैसर्गिक ठेवा पर्यटकांना पाहता यावा यासाठी 3.44 कोटी रुपयांच्या विविध सुशोभीकरणासह इतर विकास कामे करण्यात आली आहेत. या सर्व पर्यटनस्थळांच्या विकास कामांचे लोकार्पण व धबधब्याचे अधिकृत उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले.
सवतकडा धबधबा आणि परिसर आता पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे. निसर्गाचा मनमोहक अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होणार असून, या परिसराच्या विकासासाठी विविध मूलभूत सुविधा उभारण्यात येत आहेत.
सवतकडा धबधब्याचा विकास ही निसर्ग पर्यटन आणि स्थानिक विकास यामधील एक सकारात्मक पाऊल असून, वनविभाग, स्थानिक ग्रामस्थ, आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे ठिकाण लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल असे प्रतिपादन श्री.आबिटकर यांनी केले. या ठिकाणी कोल्हापूर वन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या पर्यटन कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्या वेळी स्वतः पालकमंत्र्यांनी सर्व ठिकाणी भेटी देत कामांची पाहणी केली. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना भेटून त्यांनी विचारपूस करीत त्यांच्याशी संवाद साधला. उपस्थित ग्रामस्थांसह त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चालत पर्यटनाचा आनंद लुटला.
---------------------------