कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शीर्षक वाचून प्रश्न पडला असेल ना, आता हा काय प्रकार? शाकाहारी न खालेला माणूस? सुर्य पाहिलेला माणूस हे नाटक माहित आहे पण शाकाहारी न खालेला माणूस... हो कोल्हापुरात असे एक उदाहरण आहे ते म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी विभागीय संचालक माननीय दादासाहेब मोरे सर.
तसे मोरे साहेब हे भटक्या विमुक्त जमातीतले. या जमातीचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे यांना गाव नसायचे, पत्ता नसायचा. जिथे निसर्गातील काही खायला मिळेल अशा नदीकाठी राहायचे. भटके आणि विमुक्त जमातींची खाद्यसंस्कृती ही त्यांच्या भ्रमंती, व्यवसाय, जंगलावर अवलंबित्व आणि उपलब्धतेवर आधारित असायची. त्यांचे आहाराचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर सततच्या भटकंतीमुळे ते कुठल्याही भागातील अन्न सहज स्वीकारत. 'जे उपलब्ध, ते अन्न" हा मुख्य दृष्टिकोन. शेती नसल्याने पिकांवर नाही तर जंगलातील किंवा पशुधनावर आधारित आहार असायचा. महत्त्वाचे म्हणजे मांसाहारी प्राधान्य असायचे. बहुतेक भटके जमाती मांसाहारी असतात. ते रानटी प्राणी, पक्षी, मासे, कधी कधी सांडगे मासे, वाळवलेले मांस, लोणचं यांचा वापर करतात, जे प्रवासात टिकतात. मोरे साहेबांना हाच वारसा आईच्या दुधातूनच आला. त्यामुळे ते आजही शुद्ध मांसाहारी आहेत.
साधारणपणे कोणत्याही माणसाला तीन ते चार दिवसापेक्षा जास्त मांसाहारी खाणे शक्य होत नाही. याबाबतीत मोरे सरांना प्रश्न केले असता ते एक आठवण सांगतात, त्यांना एकदा नाईलाजास्तव शाकाहारी भोजन जेवायला लागले, ते खाल्यानंतर ते जास्तच आजारी पडले आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, त्या अनुभवानंतर त्यांनी कधीच शाकाहारी भोजन घेतले नाही. शिवाय त्यांच्या जेवनामध्ये भात कधीच नसतो.
अलीकडे माणसाच्या शारीरिक तक्रारी वाढत असताना स्थूलपणा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच मांसाहारी भोजनामुळे आपल्याला त्रास होत नाही का हा प्रश्न मोरे सरांना केल्यानंतर ते म्हणतात, 'कोणतेही भोजन हे आपल्याला शरीराला अपायकारक नसते, ते आपण प्रमाणात घ्यावे आणि मांसाहरमध्ये किंवा शाकाहारीमध्ये महत्त्वाचे म्हणजे मसाल्याचे आणि तेलाचे प्रमाण हे जास्त वापरल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो, मी जे जेवण बनवतो किंवा मांसाहर खातो त्यामध्ये कमीत कमी मसाला आणि कमीत कमी तेल असते त्यामुळे ते मला पचायला सुद्धा अडचणीचा ठरत नाही. शिवाय मसाला म्हणजे थोडं खोबरं आणि जिरं जे काही थोडे बहुत वापरतो ते सुद्धा मिक्सरला न लावता पाट्यावरती बारीक करून घेतल्यामुळे त्याची चव टिकून राहते.'
मोरेसरांच्या पत्नी मा. विमल मोरे मॅडम व कन्या संहिता या शाकाहारी-मांसाहारी दोन्हीही आहेत, मोरे मॅडम दररोज शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचा स्वयंपाक बनवतात. यासाठी तुम्हाला कधी कंटाळा येत नाही काही का? असे विचारला असता, त्या आनंदाने सांगतात की, 'शाकाहारी जेवणामुळे दवाखाना करत बसण्यापेक्षा मांसाहारी स्वयंपाक केलेले काय वाईट? म्हणून आम्ही न कंटाळता स्वयंपाक करत असतो आणि कधी आम्हाला कंटाळा आलाच तर सर स्वतः मांसाहार मधील सर्व प्रकारचे पदार्थ उत्कृष्ट चवीचे बनवतात. जर कधी बाजारात चिकन, मटण, मासे उपलब्ध झाले नाहीतर घरी अंडी, बांगडा, झिंगे या पद्धतीचे लोणचे वगैरे याची व्यवस्था त्यांनी लावून ठेवलेली असते.
असे हे अस्सल मांसाहारी खवये मोरे सर आज वयाच्या 66 मध्ये आहेत, पण ना बीपीचा आजार, ना शुगरचा आजार, ना कोणती शारीरिक तक्रार यासंबंधी ते म्हणतात, 'आपलं नियमित चालणे पाहिजे, शिवाय शरीराला जी आपण सवय लावू ती सवय शरीराला लागते.'
अशा या मोरे सरांचा हा आगळावेगळा व दुर्मिळ गुणधर्म प्रत्यक्षात समजून घेण्यासाठी घरी गेलो असताना त्यांनीच बनवलेले चिकन याचा मस्त आस्वाद सुद्धा घेतला. एकूणच शाकाहारी न खालेला माणूस अनुभवता आला.
- युवराज स. कदम