पुणे : पुण्याच्या आळंदी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर येथील एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. पीडित तरुणीने 112 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात एका महिला कीर्तनकाराचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पीडित तरुणी अहिल्यानगर जिल्ह्यातील असून, गेल्या महिन्यात, म्हणजेच 2 जून रोजी, तिचे अपहरण करण्यात आले होते. तिला आळंदी येथील केळगाव रोडवर असलेल्या मुलींच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले होते. या कालावधीत तिच्यावर सतत बलात्कार करून लग्नासाठी दबाव टाकला जात होता. या प्रकरणी पीडित तरुणीने शेवगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध तक्रार दिली आहे. अधिक माहितीनुसार, 2 जून रोजी पीडित तरुणी तिच्या घरी एकटीच होती. त्यावेळी तिच्या ओळखीच्या कीर्तनकार सुनिता आंधळे तिच्या घरी आल्या. आंधळे यांनी तिला शेतात जाऊन येऊ असे सांगून घराबाहेर आणले. तेथे आधीच उभ्या असलेल्या एका काळ्या चारचाकी गाडीत (MH 43 CC 7812) तिला ढकलण्यात आले. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, अभिमन्यू आंधळे आणि कीर्तनकार सुनिता आंधळे यांनी तिला जबरदस्तीने गाडीत बसवले.
पीडित तरुणी आरडाओरड करणार तोच, तिचे तोंड दाबून 'आवाज करू नकोस, नाहीतर तुझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकू' अशी धमकी देण्यात आली, ज्यामुळे तिला गप्प बसावे लागले. यानंतर अहिल्यानगर येथून निघालेली गाडी थेट पुण्यातील आळंदी येथील मुलींच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेच्या इमारतीत थांबली. येथे अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, कीर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले. तिथे, अण्णासाहेब आंधळे याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तिच्यावर याच पद्धतीने वारंवार बलात्कार करून लग्नासाठी दबाव टाकला जात होता, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
पोलिसांची तत्परता अन् गुन्हा दाखल
या सर्व प्रकारानंतर पीडितेने स्वतःला सावरत हुशारीने 112 या क्रमांकावर कॉल करून मदत मागितली. पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवत घटनास्थळ गाठले आणि संबंधित व्यक्तींना अटक करून आळंदी पोलिस ठाण्यात आणले. सुरुवातीला पीडित तरुणी खूप घाबरली असल्यामुळे तिने तक्रार दिली नव्हती. परंतु, 7 जुलै रोजी तिने घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, गाडीचा अनोळखी चालक, सुनिता अभिमन्यू आंधळे आणि अभिमन्यू भगवान आंधळे या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे .
--------------------------