कोल्हापूर न्यूज नेटवर्क
समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे मुरगूड शहरातील शिवगड या अध्यात्मिक केंद्रामध्ये भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांची सज्जनगडावर अनेक प्रवचने झाली आहेत. सज्जनगडावरील शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी मुरगूड येथील अनेक भाविक जात असत. याशिवाय रायगड जिल्ह्यातील शिवथर घळी येथे सुद्धा डॉ .देशमुख तथा काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ भक्तांसाठी शिबिरे आयोजित केली जात असत. शिवथर घळी येथे स्वामी समर्थांनी दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखन केले. समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी हे त्यांना लेखनात मदत करत असत.या दोन्ही तीर्थक्षेत्रांचे हिंदवी स्वराज्य संस्थापनेत मोठे महत्त्व आहे.
सज्जनगडावरून आलेल्या स्वामींच्या पादुकांचे स्वागत ,दर्शन व पूजन असा कार्यक्रम शिवगड आध्यात्मिक केंद्रात संपन्न झाला. डॉ. देशमुख तथा काकाजी हे वार्धक्या मुळे घरीच विश्रांती घेत आहेत.ते स्वामींचे निस्सिम भक्त आहेत. स्वामींच्या पादुका दर्शनासाठी सव्यसाची या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आल्या.अत्यंत भावभक्तीने त्यांनी हात जोडून बिछान्यावरूनच गुरू पादुकांचे दर्शन घेतले. या भक्ती सोहळ्याला गुरु पौर्णिमेच्या गुरूपूजेची जोड देखील होती.
----------------------------