मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. 'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तानुसार, जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, त्यांना हव्या असलेल्या मंत्रिपदावरून काही अडचणी येत असल्यामुळे प्रवेश रखडल्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. त्यामुळे आगामी काळात काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आगामी काळात भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पडद्यामागे तशा घडामोडी घडत आहेत. 'एबीपी माझा'ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे. जयंत पाटील आणि भाजप यांच्यात एकमत झालं आणि पक्षप्रवेशाचं निश्चित झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला हा नवा भूकंप मानला जाणार आहे. जयंत पाटील हे खरंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अतिशय विश्वासू आणि जवळचे सहकारी आहेत. ते अनेक वर्षांपासून शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण येण्याचं टायमिंग देखील महत्त्वाचं आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यांच्या राजीनाम्याची काल चांगलीच चर्चा होती. पण त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड आणि नंतर खासदार सुप्रीया सुळे यांनी वृत्ताचं खंडन केलं. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. पण तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे सर्वकाही ठरलं आहे. आता केवळ टॉपच्या खात्याचं मंत्रिपद मिळालं तर जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. असं असलं तरी हे सगळं भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर अवलंबून असल्याची देखील माहिती आहे.
दरम्यान , याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आल्यानंतर अखेर जयंत पाटील हे माध्यमांसमोर आले. त्यांनी आपल्याबाबत सुरु असलेल्या विविध चर्चावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपण प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही. तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून भाजपात प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं आहे, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
----------------------------------------