विद्याकुंज शाळेचे सुमारे ३०० विद्यार्थी दर रविवारी आपल्या आईला सुटी देतात. रविवारी ते घरातील बहुतांश कामे स्वतः करतात. शाळेत सुरू असलेल्या 'माझी जबाबदारी' उपक्रमामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वात बदल झाला आहे. मुले आपली रोजची बहुतांश कामे स्वतः करत आहेत. मुलांचा हट्टीपणा कमी झाला आहे. ते रागावतही नाहीत. कुटुंबातील लोकांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या पद्धतीतही बदल झाला आहे. गुजरात मधील सुरत मध्ये ही शाळा आहे.
इयत्ता सातवीत शिकणाऱ्या जेनिलची आई नयनाबेन सवाणी यांनी सांगितले की, 'माझा मुलगा आता जेवायला वाढण्यापासून ते स्वतःचे कपडे धुण्यापर्यंतची सर्व कामे स्वतः करतो. घराच्या स्वच्छतेसाठी आणि स्वयंपाकघरातही मदत करतो.'
आठवीतील जान्हवीची आई मीना म्हणाल्या, 'आधी ती मोबाईलमध्ये व्यग्र असायची. आता स्वच्छतेसारखी कामे स्वतः करते.'
शाळेचे प्राचार्य महेश पटेल यांनी सांगितले की, दर महिन्याला मुले आणि पालकांसोबत बैठक होते. कोणी घरचे काय काम केले हे विचारले जाते. या उपक्रमामुळे मुलांचा अभ्यासही चांगला होत आहे. अनेक मुले अभ्यासात मागे असायची, पण घरच्या कामांत मदत केल्यानंतर त्यांच्या गुणांतही वाढ झाली आहे. आम्ही मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या कामाची ठिकाणेही दाखवतो. आई-वडिलांना मेहनत करताना पाहून मुलांच्या वर्तनात बदल होतो.
शाळेत सांगाव्या लागतात आजी-आजोबांच्या गोष्टी
मुलांना त्यांच्या दोन्हीकडील आजी-आजोबांचा लळा लागावा यासाठी शाळेने या वर्षी जानेवारीपासून संवेदना उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत मुलांना दर महिन्याला किमान एक दिवस आपल्या आजी-आजोबांसोबत राहावे लागते. त्यांच्याकडून गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात आणि त्या गोष्टी पुन्हा शाळेत सांगाव्या लागतात.
त्यासाठीच शाळेच्या कर्मचाऱ्यांना वेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. मुले आजी-आजोबांकडून आपल्या आई-वडिलांची माहिती घेतात. त्यामुळे ते स्वतःची तुलना इतर मुलांशी न करता आपल्या पालकांशी करतात.
मुलांना फुटपाथवरील मुलांसोबतही शिकवतात
मुलांत हीन भावना, ईर्षा वा लालूच यांसारखे विचार येऊ नयेत यासाठी शाळेने फुटपाथवर चालती-फिरती शाळा बनवली आहे. तेथे मुलांना फुटपाथवर राहणाऱ्या मुलांसोबत महिन्यात एक दिवस शिकवले जाते. नंतर या मुलांपैकी हुशार मुलांना शाळेत प्रवेश दिला जातो.
(शाळेची मुले आता स्वयंपाक करणे अथवा साफसफाई करणे ही फक्त मुलींचीच कामे आहेत असे मानत नाहीत. ते कुठलेही लहान-मोठी कामे करतात.)
---------------------------