कोल्हापूर न्यूज / वि रा भोसले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कित्येकजण देवाभाऊ या नावाने संबोधतात .त्यात एक प्रकारची भावनिक साद आहे.आपुलकी आहे. त्यापेक्षा त्यांच्या बद्दल एक प्रकारचा विश्वास आहे.बोटावर मोजण्याइतके कांहीजण त्यांना अणाजी पंत असे समजतात.लांब कशाला उबाठाचे उद्धव ठाकरे यांनी व्यासपिठावरच त्यांना असे म्हंटले आहे.
"अणाजी पंतांमुळे मी आणि राज एकत्र आलो."
कोण हे अणाजी पंत ?
शिवछत्रपतींच्या अष्ट प्रधान मंडळातील ते एक वजनदार मंत्री होते.ते ब्राम्हण होते. स्वराज्याच्या इतिहासात त्यांना दोषी ठरवण्यात आले होते.ते म्हणजे सारा ब्राम्हण समाज असे उद्धव ठाकरेंना दाखवून द्यायचे असेल.मनोहर जोशी सुध्दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.त्यांना उद्धव ठाकरेंनी काय वागणूक दिली हे साऱ्यांना माहिती आहे.
पालघरचे साधू,कंगना,नारायण राणे, राणा दाम्पत्य यांना त्यांनी काय वागणूक दिली हेही महाराष्ट्राने पाहिले आहे.आता देवेंद्र फडणवीस यांना बदनाम कसे करता येईल यासाठी त्यांची जीभ घसरत चालली आहे.देवेंद्रजीनी असे कोणते काम केले आहे की त्यांना उद्धव यांनी अणाजी पंत म्हंटले ? त्यांचे त्यांना माहित.आमच्या माहिती प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी संशयास्पद असे कोणतेही कार्य केलेले नाही.उद्धव यांनी चुकीची मोजपट्टी वापरली आहे.उद्धवजी खरंच हताश झाले असावेत.त्यांच्या तोंडी विरोधकांबद्धल सतत शिवराळ भाषा असते.जे सोडून गेले ते गद्दार, मिंध्ये,खोके ,आणि असे बरेच कांहीं.विरोधकांना आणि सरकारला आव्हान देण्यात सुद्धा ते मागे नाहीत.
"मर्दासारखे मैदानात या. याला त्याला महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार नाही ."वगैरे वगैरे.
एकवेळ संजय राऊत सारख्यांना ही भाषा शोभेल.कारण तेथे कांहीं बुड नसतो .सगळा उथळपणाचा कारभार. देवा भाऊंनी महाराष्ट्राची धुरा खरंच चांगली सांभाळली आहे की नाही हे जनताच ठरवेल.हिंदी सक्ती धोरणात त्यांनी मराठीचा कुठेही अवमान केला नाही.हे धोरण पूर्वी तुमचेच होते हे उद्धवना व्यवस्थित नम्रपणे माईक वर समजून सांगितले.मीरा भाईंदर मधील मराठी मोर्चा अडवल्या बद्दल पोलिसांना त्यांनी झापले. जन सुरक्षा विधेयक मंजूर करून घेतले.धर्मांतरण बंदी कायदा मंजुरीला घेतलाय.सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिलाय.पंढरीच्या वारकऱ्यांना न भूतो अशा भौतिक सुविधा करून दिल्या आहेत. टिकून राहील असे मराठा आरक्षण त्यांनीच तर दिलंय.चुकीच्या वक्तव्याबद्दल सरकारातील मंत्र्यांची सुद्धा कान उघाडणी करायला त्यांनी मागे पुढे पहायला नाही.शिक्षकांचे,शेतकऱ्यांचे सारे प्रश्न अत्यंत सहानुभूतीने समजाऊन घेऊन त्यावर तोडगा काढलाय. सर्वात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवली आहे. ना स्वतःचा साखर कारखाना,ना एखादा उद्योग.ना मोठी शिक्षण संस्था.ना परदेशात प्रॉपर्टी.
राज्यासाठी आणि देशासाठी स्वतःला खपवून घेणारा मुख्यमंत्री अशीच त्यांनी स्वतःची प्रतिमा राखली आहे.त्यात मग हा अणाजी पंत कोठून आला ?प्रभू राम शबरीची उष्टी बोरे खातात,सुग्रीव व हनुमंताला मिठी मारतात,निषाद राजा ला मित्र मानतात, केवटाला कवटाळून गंगा पार होतात .कसला आलाय त्यात जातीय वाद ?रामराज्य उगीच म्हणत नाहीत.देवेंद्र रामाच्या उंचीला पोचणार नसले तरी त्यांचा आदर्श घेऊन गाडा हाकत आहेत.त्यांना चाणक्य मात्र जरूर म्हणतात. नंद राजाचा अहंकार व उद्दाम पणा उतरवण्यासाठी त्यांना चाणक्य व्हावे लागले असेल.म्हणून ते देवाभाऊ की अणाजी आहेत हे महाराष्ट्राने ठरवायचे आहे.उद्धवजीनी नाही.
जय महाराष्ट्र.
---------------------