पुणे पदवीधरच्या जागेवर मंत्री हसन मुश्रीफांचा दावा

Kolhapur news
By -

   

         


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे पदवीधर मतदारसंघावर दावा करत आपले निकटवर्ती भैय्या माने यांच्या नावाची घोषणा करुन टाकली आहे. आमदार अरुण लाड यांच्या विजयामध्ये भैय्या माने यांचा वाटा मोठा असून आम्ही अजित पवार यांच्याकडे भैया माने यांच्या उमेदवारीची मागणी करणार आहोत अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. 


 भैय्या माने यांनी देखील शिक्षण संस्थांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. पदवीधरच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी मतदाराची नोंदणी करून घ्यावी लागते. जो पक्ष अधिक नोंदणी करतो त्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडत असते. महायुतीमध्ये ज्या पद्धतीने उमेदवारी बाबत त्रांगडे निर्माण झाला आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यामुळे महाविकास आघाडी अरुण लाड यांना उभा करणार की नवा उमेदवार शोधणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

यापूर्वी पदवीधरची लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच झाली आहे. त्यामुळे भाजप ही जागा राष्ट्रवादीला सोडणार का हा खरा प्रश्न आहे. कारण पुणे पदवीधर मतदार संघामधून चंद्रकांतदादा पाटील हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपने देखील या मतदारसंघावर आपला दावा केला आहे.

पुणे पदवीधर आमदारकीच्या निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहेत. मात्र आतापासून आपल्या उमेदवाराचं नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न करून सुरू झाला आहे. सध्या पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड  असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आले आहेत. त्यामुळं आता ही जागा राष्ट्रवादीलाच मिळायला हवी अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफ  यांनी केली आहे.

       
                 ------------------------