कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वाघापूर ता. भुदरगड येथील नागपंचमी यात्रे नंतर केदारलिंगाच्या मंदिरातील चार ट्रॉली कचरा मुरगूड येथील शिवभक्तांनी काढला.
अचानक आणि अनपेक्षित शिवभक्तांची स्वच्छता मोहीम पाहून वाघापूरच्या नागरिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.वाघापूर मधील कांहीं युवक सुद्धा यात सामील झाले. मंदिर स्वच्छतेची ही विधायक परंपरा मुरगूडच्या शिवभक्त समाजसेवकांनी बाळूमामा मंदिर आदमापूर, हालसिद्ध नाथ मंदिर कुरणी , दत्त घाट मुरगूड या व अशा अनेक धार्मिक व पवित्र ठिकाणी सुरू ठेवली आहे.
कोणताही मोबदला न घेता स्वयंस्फूर्तीने या युवकांनी गेल्या दोन वर्षापासून चालवलेल्या या परंपरेला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. त्यांचा आदर्श घेत गावोगावचे युवक सुध्दा या मोहिमेत झोकले जाऊ लागले आहेत. निरपेक्ष सेवादन म्हणजे मानसिक आनंदाची पर्वणी असते.
जनसेवेची सुध्दा एक नशा असते व ती अमली पदार्थांच्या नशेला कोसो दूर लोटून देऊ शकते असे या युवकांनी सांगितले. त्यांच्या या विधायकतेवर राजकीय नेत्यांनीही शिक्का मोर्तब केले आहे कारण या मोहिमेत शेकडो युवक हळूहळू सहभागी होत आहेत. वाघापूर मंदिरात नारळाच्या शेंड्या,सांडलेले खरकटे,चिखलाने माखलेल्या वस्तू,प्लास्टिकच्या बाटल्या इत्यादी कचरा दुर्गंधीचा सामना करत युवकांनी ट्रॉलीत भरला. त्यांचे उस्फुर्त काम पाहून कमरेवरचे हात झटकून गावकरी युवक सुध्दा सामील झाले. सामाजिक सेवेचे असे भान युवकांच्यात निर्माण झाले तर चांगल्या समाजपरिवर्तनाची ती नांदी ठरेल असे वाघांपूरच्या प्रतिष्ठित नागरिकांनी म्हंटले. भल्या पहाटेपासून चार पाच तास चाललेल्या या स्वच्छता मोहिमेची सांगता शिवछत्रपतींच्या जयघोषाने झाली.
सहभागी युवक याप्रमाणे...
सर्जेराव भाट ,तानाजी भराडे ,आनंदा रामाने, शिवाजी चौगुले ,धनंजय सूर्यवंशी ,अमोल मिटकरी, अमर सुतार, रघुनाथ घोडके, प्रफुल्ल कांबळे ,विनायक मेटकर, ओंकार पोद्दार ,जगदीश गुरव ,नामदेव भराडे, विकास पाटील, वाघापूर ग्रामपंचायत सरपंच धनाजी एकल, देवालय समितीचे बापूसाहेब आरडे ,अनिल शिंदे व वाघापूर ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी.
---------------------