संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करा

Kolhapur news
By -

 

            



  मुंबई : महाराष्ट्रासह, कर्नाटक व अन्य राज्यात श्री संत बाळूमामा यांना मानणारा मोठा भक्तवर्ग आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री संत बाळूमामा देवस्थानच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कायद्याची गरज आहे. त्यासाठी स्वतंत्र कायदा करा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्याला वाटे उद्धार व्हावा, त्याने संत बाळूमामा गुरू करावा, ही भावना महाराष्ट्रातील, बहुजन समाजातील जनतेच्या हृदयात आहे. संत बाळूमामांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील शेवटच्या घटकाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. दरवर्षी देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातून हजारो भाविक आदमापूर येथे दर्शनासाठी, सेवा-पूजेकरिता येत असतात. त्यांच्या भक्तिभावाने दिलेली देणगी ही फक्त देवस्थानच्या आध्यात्मिक आणि सामाजिक विकासासाठी वापरली जावी, अशी सार्वत्रिक अपेक्षा आहे. सध्या कार्यरत असलेल्या व्यवस्थापन यंत्रणेमुळे काही गोष्टींमध्ये पारदर्शकतेचा अभाव  जाणवतो. अनेक भक्तांकडून सुविधांबाबत तसेच नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. देवस्थानच्या मिळकतींचा अधिक प्रभावी उपयोग व्हावा, यासाठी व्यवस्थापन प्रक्रियेत सुस्पष्ट नियमावली, उत्तरदायित्व आवश्यक आहे. जसे श्री महालक्ष्मी मंदिरासाठी २०१८ चा स्वतंत्र कायदा तयार करण्यात आला, त्याच धर्तीवर श्री संत बाळूमामा देवस्थानसाठी (आदमापूर) स्वतंत्र कायदा तयार करण्यात यावा.

           

मुंबई : संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देताना आमदार  गोपीचंद पडळकर




----------------------