नाशिक:अभ्यासात हुशार अन् मनमिळाऊ स्वभावाची असलेल्या श्रेयाला मंगळवारी (दि.५) सकाळी तिच्या आईने दुचाकीवरून शाळेत सोडले, मम्मीला बाय बाय करीत हसत खेळत ती शाळेत पोहोचली. श्रेया वर्गात गेली, मात्र प्रार्थना सुरू असतानाच ती चक्कर येऊन पडली, शिक्षकांनी तत्काळ तिच्या छातीला पंपिंग केले. मात्र त्याआधीच श्रेया निघून गेली होती.
नाशिकरोड येथील उत्सव मंगल कार्यालयाच्या पाठीमागे राहणारी श्रेया किरण कापडी (वय ११) ही इयत्ता सहावीत शिकत होती. पालक, शिक्षक आणि मैत्रिणी तिची काळजी घेत होते. त्यामुळे ती हसत खेळत शिक्षण घेत होती. मंगळवारी सकाळीही ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली आणि प्रार्थनेवेळी ती जमिनीवर कोसळली. शिक्षकांनी प्राथमिक उपचार म्हणून तिच्या छातीवर पंपिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रयत्न अपुरे पडले. तिला तत्काळ जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
---------------------