कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश : महादेवी हत्तीणला वनतारा करणार परत

Kolhapur news
By -

 

            


        कोल्हापूर न्यूज नेटवर्क


नांदणी मठातील महादेवी हत्तीणला गुजरात येथे हलविण्यावरुन निर्माण झालेला जनतेच्या असंतोषापुढे वनतारा व्यवस्थापनाला नमते घ्यावे लागले. महादेवी हत्तीणला परत कोल्हापुरात आणण्यासंबंधी नांदणी मठ, राज्य सरकार व वनतारा व्यवस्थापन यांनी संयुक्तपणे सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. सगळया प्रकिया पूर्ण करुन लवकरात लवकर महादेवी हत्तीणला नांदणी मठाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवान करानी यांनी कोल्हापुरात सांगितले.


महादेवी हत्तीणला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी जनमताचा रेटा वाढत आहे. जनभावनांची दखल घेत वनताराचे सीईओ विहान यांनी बुधवारी पुन्हा कोल्हापूरकडे धाव घेतली. येथील दिगंबर जैन बोर्डिंग येथे संयुक्त बैठक झाली. नांदणी मठाचे भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामी, कोल्हापुरातील मठाचे भट्टारक पट्टाचार्य लक्ष्मीसेन महास्वामी, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, सावकार मादनाईक, कृष्णराज महाडिक, संजय पाटील यड्रावकर व वनताराचे सीईओ विहान यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत महादेव हत्तीणला परत आणण्यासंबंधीच्या प्रक्रियेसंबंधी चर्चा झाली.


 या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सीईओ विहान म्हणाले, ‘महादेवी हत्तीणवरुन कोणाच्याही भावना दुखावण्याचा वनताराचा हेतू नव्हता.  अनंत अंबानी यांनी सांगितले आहे की कोल्हापूरकरांच्या भावना दुखावयाच्या नाहीत. महादेवी हत्तीण लवकरात लवकर नांदणी मठामध्ये परत कशी आणता येईल यादृष्टीने आता काम सुरू आहे. त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून नांदणी मठ, राज्य सरकार व वनतारा व्यवस्थापन यांनी संयुक्तपणे सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. यामध्ये कोणाचीही हार नाही, कोणाचा विजय नाही. हा हत्तीचा विजय आहे. लवकरच महादेवी हत्तीण नांदणी मठात येईल.’


 नांदणी मठाचे भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामी यांनी, महादेवी हत्तीणला पुन्हा आणण्यासंबंधी आता संयुक्तरित्या प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरले आहे.यासाठी कोर्टात संयुक्तपणे याचिका दाखल करण्यात येणार आहे. बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली. महादेवी हत्तीणची मालकी नांदणी मठाकडेच असेल. दरम्यान हत्तीणच्या देखभालीसाठी नांदणी मठ परिसरात पालणपोषण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्या केंद्रात पालनपोषणसहित आवश्यकतेनुसार उपचार वनताराकडून केले जातील.


 

           ------------------------