कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
यंदा पावसाचे वागणे जरा वाकड्या चालीचे दिसते. चार महिने अगदी पटात होता . जाता जाता मात्र इस्कोट करून गेला.पिके किती झोकात आली होती.नुसती डोलत होती.दसरा दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या अंगणात टिपऱ्यांचा खेळ खेळत होती. निसर्गाचे शकुनी फासे उलटे पडले , पावसाने कमाल केली आणि सारं काही वाहून गेलं. हातात तोंडाशी आलेला घास जाता जाता पावसाने हिरावून घेतला. मराठवाड्यात ओला दुष्काळ सुरू झाला.
पाण्यात बुडालेल्या पिकांकडे हताशपणे पहात शेतकरी आक्रोश करू लागला. पाहणारा बाया बापड्या दुःखाने व्याकुळ झाल्या . प्रसारमाध्यमावर मराठवाड्यातील दुष्काळाचे विदारक दृश्य महाराष्ट्र पाहत होता. सरकारची आता खरोखर कसोटीची वेळ होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना आणि आमदारांना आपापल्या जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्याचे आदेश दिले. नुकसान भरपाईचे आकडे जाहीर केले .धावाधाव सुरू झाली. महाराष्ट्राच्या विकासाचा वसा घेतलेल्या सरकारला स्वस्त बसणं शक्य नव्हतं . इकडे विरोधकांना मात्र आनंदाच्या गुदगुल्या होत्या. शेतकरी अडचणीत आहे याचे त्यांना कांहीं पडले नव्हते.सरकार अडचणीत आहे म्हणून ते टाळ्या वाजवत होते.उद्धव ठाकरे म्हणाले दहा हजार कोटी नुकसान भरपाई द्या.ओला दुष्काळ जाहीर करा.
कोरोना काळात मास्क लावून मातोश्रीवर बसून सरकार चालवणाऱ्या उद्धवजीना यापेक्षा अधिक काय जमणार ? शेतकऱ्यासाठी चिखलातून रपेट करावी लागते .हेलिकॉप्टरमध्ये बसून गॉगल मधून दुष्काळ पहायचा नसतो हे यांना कसे कळणार ? भरपाईची १० हजार कोटींची अवाजवी भाषा बोलून त्यांनी आपल्या वैचारिक दुष्काळाची प्रचिती दिली आहे.सरकारने ओला दुष्काळ लगेच जाहीर करावा असे मातोश्रीत बसून सांगणे हे सुद्धा त्याचेच द्योतक आहे.रोहित पवार यांचा विदुषी खेळ सुध्दा मनोरंजक वाटला.एका शेतकऱ्याच्या हातातला भोपळा नाचवत ते म्हणतात सरकारने शेतकऱ्याला भोपळा दिला.
वास्तविक हे भयंकर असे नैसर्गिक संकट आहे.सरकारने लादलेले नाही. मराठवाड्यापुरते मर्यादित आहे. तेथे ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती असेल तर सरकारला निश्चित तशी पावले उचलावी लागतील. तेथे ओला दुष्काळ जाहीर झाला तर तेथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल.त्यांची कर्जे माफ करावी लागतील.त्यांच्या बांधावर जाऊन खांद्यावर सहानुभूतीचा हात ठेवावा लागेल. देवेंद्र सरकार अशी पावले निश्चित उचलेल. हा दुष्काळ महाराष्ट्र व्यापी नाही हे माहित असूनही उद्धव आणि रोहितना खुर्चीची स्वप्ने पडावीत हेच दुर्दैव आहे.कार्यकर्त्यांसह गाळात उतरून शेतकरी बांधवांना त्यांनी आधार दिला असता तर लोकांनी पाठ थोपटली असती. केवळ सरकारला लक्ष करणे हे राजकीय मतलबीपणाचे लक्षण आहे.याला वैचारिक दुष्काळ यापेक्षा अन्य नाव नाही. दसरा दिवाळीच्या तोंडावर युती सरकारच्या कसोटीचा काळ मात्र सुरू झाला आहे हे निश्चित.
--------------------------

