कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सन २००४पासून झी मराठी वाहिनीवर सुरू झालेला होम मिनिस्टर कार्यक्रम महाराष्ट्रात अफाट लोकप्रिय झाला.महिला वर्गाला या कार्यक्रमाने घातलेली मोहिनी २०वर्षानंतरही कमि झालेली नाही.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर तर अख्ख्या महाराष्ट्राचे आदेश भाऊजी झाले. या कार्यक्रमाची गंमत कांहीं औरच असते.विजेत्या महिलेला हजारो रुपये किमतीची पैठणी साडी मिळते.तिचा पती धावत व्यासपीठावर येतो व आपल्या लाडक्या पत्नीला खांद्यावर उचलून घेतो .
आता गावागावात हे कार्यक्रम होऊ लागले आहेत.गणेशोत्सवात तर या कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.शारदीय नवरात्रोत्सवात सुद्धा होमिनिस्टर ने मार्केट मारले आहे.नऊ दिवसांचे नऊ रंग ,महिषासुरमर्दिनी दुर्गा मातेची नऊ रूपे,म्हणजे महिलांच्यासाठी ही पर्वणीच असते.
त्यात जर होमिनिस्टर सारखा कार्यक्रम असेल तर *सोनपे सुहागा *.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी मोठ्या शहरात अनेकजण तयार झालेत. त्यामध्ये कांहीं पुरुष असतात तर कांहीं महिला ही असतात.त्यात सिनेकलावंत देखील असतात.त्यांना निमंत्रित करून आणण्याचा खर्चही मंडळांना परवडत नाही. गावात तसे कलाकार मिळतही नाहीत.त्यासाठी उत्तम संभाषण कौशल्य ,अभिनयाची जाण,समयसूचकता असावी लागते.
असा गुणसंपन्न सूत्र संचालक मुरगूड मध्ये सापडला .सहज त्यांचा कार्यक्रम पाहण्याचा योग आला.रुबाबदार व्यक्तिमत्व ,डोक्यावर ऐटबाज फेटा,अंगात उंची जॅकेट,डोळ्यावर चष्मा .खणखणीत आवाज आणि मध्ये मध्ये खुलणारे गोड स्मित. त्यांना पहाताच आदेश भाऊजींची आठवण व्हावी.या उमद्या युवकाचे नाव विशाल भोपळे. विशालने शाळेत असतांना वक्तृत्व स्पर्धात भाग घेऊन बक्षिसे मिळवली आहेत.नम्र स्वभावाने महिलांचा विश्वास संपादन केला आहे.कागल कोल्हापूर अशा ठिकाणीही विशालने कार्यक्रम केले आहेत. कोल्हापूर न्यूज नेटवर्कशी बोलतांना त्याने कांहीं छायाचित्रे व व्हिडिओ दाखवले.
विशालची आर्थिक स्थिती उत्तम आहे.वडील राम भोपळे हे मोठे उद्योजक आहेत.वडिलोपार्जित उद्योग सांभाळत केवळ आवड म्हणून विशाल या मनोरंजन क्षेत्रात उतरला आहे.ग्रामीण महिला "चूल आणि मूल" च्या पाशातून बाहेर पडाव्यात व धैर्याने समाजात वावराव्यात हा एक उद्देश यात आहे.दिवसभर पती सोबत शेतात चिखल मातीत काम करणाऱ्या महिलांनाही त्याने स्टेजवर आणले.त्यांच्या भाबड्या चेहेऱ्यावर हास्य खुलवले. त्यातल्या एखाद्या भगिनीने पैठणी जिंकलीच तर तिचा पती मातीने बरबटलेल्या हातानेच तिला उचलून घेतांनाचे दृश्य खरंच विलोभनीय भासते. गाव खेड्यातल्या या उद्योजक भावोजीला सलाम.
-----------------------

