तलाव स्वच्छतेसाठी एकवटले चिखलीकर

Kolhapur news
By -

 

                   



      
           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  नानीबाई चिखली येथील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या तलावातील पाणी दूषित झाल्यामुळे मासे मृत झाले होते , याविषयीचे वृत्त दैनिक पुढारीत प्रसिद्ध झाल्यानंतर व सोशल मीडिया वरून याविषयी आवाज उठवल्यानंतर चिखलीकरांनी एकत्रित येऊन श्रमदान करून दूषित पाण्याला बाहेर  जाण्याचा मार्ग करून देत तलाव परिसर स्वच्छ केल्याने तलावातील माशांना जीवदान मिळाले आहे. 


       एकेकाळी गावाचे वैभव असणारा हा तलाव आज प्रदूषणाच्या विळख्यात  सापडल्याने मासे मृत होऊन दुर्गंधी पसरली होती. याची दखल घेत गावातील तरुणांनी तलाव स्वच्छतेसाठी एकत्र येण्याचे सोशल मीडिया वरून आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत चिखलीकर श्रमदान करण्यासाठी तलावाजवळ एकवटले तलाव परिसरातील चार टन कचरा बघता बघता गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.  तलावाच्या काठावर असलेली झाडे तोडण्यात आली , तसेच तलावाच्या उत्तरेकडील बाजूला ग्रामपंचायतीने दिलेल्या जेसीबीच्या माध्यमातून मोठी चर काढून दूषित पाणी बाहेर काढले. शासनाच्या कोणत्याही निधीची वाट न पाहता चिखलीकरांनी  स्वयंस्फूर्तपणे पुढाकार घेऊन तलाव स्वच्छतेसाठी योगदान दिल्यामुळे तलावाने मोकळा श्वास घेतला आहे. 


   गाव करील ते राव काय करील ? या म्हणीचा प्रत्यय प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळाला. यापूर्वीही दहा वर्षांपूर्वी अशीच तरुण पिढीच्या पुढाकाराने तलावाची स्वच्छता मोहीम राबवली होती. ग्रामस्थ पुढाकार घेऊन जर तलाव स्वच्छ करत असतील तर ग्रामपंचायत आणि शासन काय करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. चिखलीतील तलावाला निधी मिळण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे दाखल केलेला असून त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे, पण अद्याप तरी निधी उपलब्ध झालेला नाही. चिखलीचे वैभव असणाऱ्या या मिनी रंकाळ्यासाठी शासनाकडून निधी मिळावा आणि तलावाची कायमस्वरूपी मजबूत तटबंदी केली जाऊन तलावाची उत्तम दर्जाची निगा राखली जावी अशी मागणी चिखलीकरांच्यातून होत आहे. 

             

  
नानीबाई चिखली येथील तलावातील दूषित पाणी चर काढून बाहेर काढण्यात आल्याचे छायाचित्र



          ---------------------------