भक्तांच्या हाकेला धावणारे संत बाळूमामा. माणसं आणि मेंढरं यांच्यात रमलेला महात्मा.

Kolhapur news
By -

           


        कोल्हापूर न्यूज /  वि . रा .भोसले


     आदमापुरचे संत श्री बाळूमामा यांना भक्तांचे तारणहार म्हणतात.अत्यंत साधी रहाणी असलेल्या बाळूमामांच्या मध्ये अदृष्ट ईश्वरीय शक्तीचा वास होता हे जेव्हां लोकांना काळत गेले तेव्हा त्यांच्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.मामा हयात असतांना व हयातीनंतरही भक्तांच्यावर कृपा करत आलेत याची प्रचिती अनेकांना आली आहे.


   मामांची जयंती आदमापूर येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात येणार आहे.त्यांच्या अलौकिक जीवनाविषयी जाणून घेऊया.

  

बाळू मामांचा जन्म ३ ऑक्टोबर १८९२ साली  कर्नाटकातील अकोळ या गावी  एका धनगर कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मायाप्पा आणि आईचे नाव सुंदरा असे होते. आईवडीलांच्या नंतर बहिणीने त्यांचा सांभाळ केला.बहिणींने त्यांच्या लहान वयातच आपल्या मुलीबरोबर विवाह लाऊन दिला.ईश्वरीय ओढ असलेल्या मामांना हा विवाह मान्य नव्हता. त्यांचे मन संसारात रमत नव्हते.बकऱ्यांच्या मागोमाग फिरत असतांना त्यांच्यात अद्भुत ईश्वरीय गुण जाणवू लागले आणि त्यांचे हजारो भक्त निर्माण झाले. कर्नाटक,आंध्र व महाराष्ट्रात त्यांचे भक्त पसरलेले आहेत.आज त्यांच्या भक्तांची संख्या लक्षावधी आहे.दर अमावस्येला आदमापूरला भक्तांचा मेळा भरतो.


   महाराष्ट्रातील शिर्डी चे संत साईबाबा आणि शेगावचे संत गजानन महाराज यांच्या तीर्थक्षेत्रासारखे आदमापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र बनत आहे.याला कारणे ही तशीच आहेत. मामांच्या ठायी नकारात्मकता औषधालाही मिळणार नाही.त्यांचे शब्द कधी खोटे होत नाहीत .शुद्ध भक्तिभावाने त्यांचे समोर केलेली प्रार्थना वाया जात अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यासाठी मंदिरात जायला हवे असे नाही."फोटोसमोर उभे राहून सुद्धा प्रार्थना करा.मी तुमच्या पायाच्या टाचेखाली असेन "असे या थोर महात्म्याने म्हंटले आहे.आदमापूर येथील मरगुबाई  मंदिरात त्यांचे वास्तव्य असायचे . त्यांचे बोलणे कणखर असायचे .त्यांच्या  शिवित सुद्धा शुभाशीर्वाद असायचा.त्यामुळे मामा म्हणजे भक्तांना जीव की प्राण वाटायचे.


    आपल्या देशातील प्राचीन ऋषी मुनींनी तपश्चर्येतून निसर्गावरही सत्ता प्राप्त केली होती . त्याप्रमाणे मामांनीही निसर्गावर नियंत्रण ठेवण्याचे चमत्कार करून दाखवले. सेनापती कापशी येथील भंडाऱ्यात जेवणाच्या पंक्ती बसल्या होत्या आणि आकाशात पावसाचे काळे दाटले होते. पाऊस पडला तर जेवणाच्या पंगती  विस्कटून सगळे अन्न मातीत मिळणार होते.मामांनी मेघांच्या दिशेने भंडारा फुंकला आणि प्रार्थना केली. क्षणार्धात ढग पांगले आणि पाऊस दूरवर निघून गेला.महापुराच्या पाण्यातून मेंढ्यांच्या कळपाला मामांनी वाट करून दिली होती ,असे त्यांच्या ग्रंथातही सांगितले आहे.


  असे एक ना दोन असंख्य चमत्कार मामांच्या आयुष्यात घडले होते.पंढरीच्या पांडुरंगाने आणि करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीने त्यांना दृष्टांत दिल्याची नोंद त्यांच्या चरित्रात आढळते. त्यांच्या अलौकिक चरित्रावर अनेक पुस्तके ग्रंथ , गीते, पोवाडे आणि दूरदर्शन मालिकाही तयार झाल्या आहेत.परवा एक चित्रपटही निघाला .


   संत तुकाराम ,ज्ञानदेव नामदेव ,एकनाथ, गोऱ्हा कुंभार, विसोबा खेचर , सावंतां माळी या संतांनी महाराष्ट्रात भक्तीची परंपरा उभी केली. त्यातून लोकांच्या  मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होऊ लागले. अलीकडच्या संतांनी तीच परंपरा सुरू ठेवली आहे. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी यांना तडीपार करा असा संदेश या संतांनी दिला होता. मामांच्या आयुष्यात सुद्धा त्यांनी हाच संदेश आपल्या भक्तांना दिला आहे. 


    त्यांचा जन्मदिन साजरा करताना व्यवस्थापन समितीने सर्व भक्तांना तळमळीने आवाहन केले आहे की मामांची खरी भक्ती करत असाल तर

" अंधश्रद्धेपासून दूर राहा, भोंदूगिरी पासून सावध राहा ".

             या महान संतांच्या चरणी

                कोटी कोटी प्रणाम


                      ------------------