शालिनीताई पाटील यांचे निधन

Kolhapur news
By -

 

              


       मुंबई :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. त्यांनी मुंबईतील माहिम येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धाडसी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.


यासंबंधीच्या माहितीनुसार, शालिनीताई पाटील गत काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर माहिम येथील त्यांच्या राहत्या घरीच उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती दिवसागणिक खालावत होती. अखेर आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेऊन आपली इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील मूळगावी अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे.


शालिनीताई पाटील यांनी मंत्री व आमदार म्हणून दणकेबाज काम केले. त्यांनी मराठा आरक्षणासाठीही आवाज उठवला. पण त्यांना त्यांचा पक्ष व जनतेची फारशी साथ मिळाली नाही. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना मातेसमान दर्जा देत त्यांना कायम साथ दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण म्हणून केला होता.


आक्रमक आमदार म्हणून होत्या लोकप्रिय


शालिनीताई पाटील यांनी राज्याच्या राजकारणावर स्वतःची एक वेगळी छाप उमटवली होती. त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून त्या 1999 ते 2009 या काळात आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. तत्पूर्वी, 1990 मध्ये त्यांनी जनता दल व 1995 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.


शालिनीताई यांनी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या नेतृत्वतील काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिपदही भूषवले होते. पण त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अंतुले यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली असे सांगण्यात येते.


      ----------------------------