कोल्हापूर न्यूज नेटवर्क
दौलतवाडी ता. कागल येथील गुरुवर्य कै. ग. बा. सावंत मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, दौलतवाडी (ता. कागल) या सामाजिक संस्थेचे उदघाटन व ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या मळगी व स्टोअर रूमचा लोकार्पण सोहळा तसेच गुरुवर्य कै. ग. बा. सावंत यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता भैरवनाथ मंदिर, दौलतवाडी येथे संपन्न होणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व भारतात ग्रामीण भागातील शेतकरी जनतेची शिक्षणाची परवड होत असताना थोर शिक्षण तज्ञ बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर शिक्षण महर्षी एम आर देसाई यांच्या खांद्याला खांदा लावून गुरुवर्य ग बा सावंत यांनी कागल तालुक्यात मुरगुड येथे मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज स्थापना 1946 साली करून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन अमुलाग्र बदलण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्याचा वैचारिक वारसा निरंतर ठेवण्यासाठी त्यांचे नातू संग्राम सावंत यांनी या ट्रस्टची उभारणी केली आहे.
ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष संग्रामसिंह शिवाजीराव सावंत हे अमेरिका येथील एससीजी डिझाइन सोल्युशन्स या बहुराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक संचालक आहेत. एससीजी डिझाइन सोल्युशन्स ही अमेरिका व भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या सिव्हिल इंजिनिअरिंग कंपन्यांपैकी एक असून कंपनीचे मुख्यालय डोव्हर, डेलावेअर (यूएसए) येथे आहे. सॅन दिएगो (कॅलिफोर्निया), बोस्टन (मॅसॅच्युसेट्स), पिट्सबर्ग (पेनसिल्व्हेनिया) आणि माउंटन लेक्स (न्यू जर्सी) येथे कंपनीची संलग्न कार्यालये आहेत. भारतात पुणे येथील हिंजवडी आय.टी. पार्क व चंदीगड आय.टी. पार्क येथे कंपनीची कार्यालये कार्यरत आहेत.
ट्रस्टच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून वंचित कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य स्कॉलरशिप इयत्ता दहावी बारावीतील तालुक्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण रोप्य कास्य पदक प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येते यावर्षीपासून विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्वांना त्यांच्या कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.ट्रस्ट उद्घाटनाचा सोहळा मुरगूड येथील लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक,पुंडलिक डाफळे यांच्या हस्ते होणार आहे.
गुरुवर्य ग. बा. सावंत यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक पी. जी. पाटील गुरुजी (मांगोली, ता. राधानगरी) यांच्या हस्ते पार पडणार आहे. तर ट्रस्ट तर्फे उभारण्यात आलेल्या मळगी व स्टोअर रूमचा लोकार्पण सोहळा मांगोलीच्या पी. जी. पाटील गुरुजींनी घडवलेल्या सैनिक स्कूल सातारा येथील माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ट्रस्टच्या वतीने पहिला जीवनगौरव पुरस्कार शैक्षणिक योगदानाबद्दल पी.जी. पाटील गुरुजींना प्रदान करण्यात येणार आहे.
या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशस्वी उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते व शेती तज्ज्ञ प्रताप (बापू) कोंडेकर (अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर कैलासवासी फिरंगोजी शिंदे शिक्षण संस्था, गिरगाव) हे असून माजी मुख्याध्यापक शिवाजीराव सावंत, नेताजीराव सावंत व राजेंद्र सावंत हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष संग्रामसिंह शिवाजीराव सावंत, मनीषा संग्रामसिंह सावंत यांच्यासह ट्रस्ट पदाधिकारी, आजी माजी शिक्षक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------------------

