कोल्हापूर न्यूज नेटवर्क
साठ वर्षानंतर गुरु शिष्य एकत्र आले.आठवणींच्या हिंदोळ्यात अश्रूंच्या धारांनी न्हाऊन निघाले.आयुष्याची पोकळी भरून काढणारी अद्भुत अशी सत्य घटना
.जोतिबाच्या पायथ्याशी एक निसर्ग रम्य खेडे. गावाचे नाव पोहाळे. साठ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद संस्थेच्या निगवे येथील ज्योतिर्लिंग विद्यामंदिर या माध्यमिक शाळेत शिकलेले विदयार्थी एकत्र आले. बहुतेक सगळेच निवृत्तीत गेलेले होते. डोक्यावरचे केस पिकलेले, मिशाही पिकलेल्या, मुळेबाळे, सुना, नातवंडे यांनी सर्वांचे संसार भरलेले होते. भौतिक सुखे पायाशी लोळण घेत होती. कोणी संस्थाचालक, कोणी पी एच डी डॉक्टर, प्राचार्य, कोणी माजी सरपंच, कोणी प्रगतीशील शेतकरी, दत्त भक्त, स्वाध्याय ग्रुप सदस्य असे विविध विभागातील हे सगळे निवृत्त जेष्ठ नागरिक एका गावातल्या मंगलमय कार्यक्रमात एकत्र आले. जुन्या आठवणी,, जुनी शाळा, सवंगडी आणि त्यांना शिकविणारे त्यावेळचे शिक्षक असे एकेक चित्रपट समोर येत राहिले तेंव्हा त्यांना आपल्या उभ्या आयुष्यातील मोठी पोकळी राहिल्याची जाणीव झाली.
आपण हे सगळं मिळवलं ते त्या गुरुजनांच्या संस्कारा मुळेच. त्यानंतर त्यांची आपण भेट सुद्धा झाली नाही. त्यात एकाने विचारले अरे आपणच आता सत्तरी ओलांडली आहे. आमचे गुरुजन असतील का हयात?एक स्मशान शांतता पसरली. कांही नाही आपण शोध घ्यायचाच. आपण हायस्कुलला होतो तेंव्हा शिक्षक तरुण होते.आपल्यापेक्षा फार तर सात आठ वर्षाने मोठे असतील.शोध घेऊयाच.आणि निवृत्तीत गेलेल्या जुन्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा शोध सुरू केला. तीन-चार शिक्षक शिक्षिका हयात असल्याचे त्यांना समजले. 80 वर्षे पूर्ण करून सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याकडे काहीजण सरकल्याचेही समजले.येतील का ते आपल्याकडे? घरचे पत्ते काढून आणि फोन नंबर मिळवून त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधलाच.जोतिबाच्या पायथ्याशी एका उंच टेकडीवरील रिसॉर्ट मध्ये त्यांनी गुरु शिष्य भेटीचा सोहळा आयोजित केला. रिसॉर्ट ही त्यांचेच.
आपल्या यशस्वी आयुष्याचा लेखा जोखा गुरु चरणी अर्पण करायचा आणि त्यांच्या समवेत स्नेह भोजन करायचे असे ठरले होते. त्यावेळच्या मोहिनी मोरे मॅडम आणि भोसले सर त्यांच्या मुलांसमवेत या कार्यक्रमाला आले होते.म्हातारपणाची उन्हे सर्वांना दद्ध करत असली तरी त्या निसर्गात चैतन्यदायी गारवा पसरला होता. आस्था, प्रेम, जिव्हाळा यांचे ओहोळ वाहू लागले होते.गणिताचे भोसले सर मध्येच गेले म्हणून शाळाच सोडून घरी बसलेला विश्वास काटकर आज एक हायस्कुल चालवतोय. पदवी नंतर काय करू, कोठे जाऊ म्हणतं चाचपडणारा विलास प्राचार्य होऊन निवृत्त झालाय. सात पुस्तके त्याने लिहिली आहेत. माजी सरपंच, चेअरमन सारेच सद्गदित झाले होते. अनेक वेळा निवडणुकीत गुलाल उधळलेली पोरे गुरूंच्या समोर चष्मा काढून वारंवार नॅपकिनने डोळे पुसत होती. आयुष्यातील पोकळी भरून काढत होती. जे शिक्षक गेले आणि जे उरले त्या सर्वांच्याच आठवणीने ते भावुक झाले होते. मोरे मॅडम स्वभावाने दिलखुलास होत्या. मुसमुसणाऱ्या पोरांच्या पाठीवर हात ठेऊन खळखळून हसून दाद देत होत्या. साठ वर्षा पूर्वीची ती थाप आजही या निवृत्त झालेल्या माजी विदयार्थ्यांना ऊर्जा देत होती.मनातली पोकळी भरून काढत होती.
या जेष्ठ पोरांचे संस्कार असे की त्यांची मुले, सुना आणि नातवंडे सुद्धा न सांगता नतमस्तक होत होती. रिसॉर्ट च्या खिडकीतून जोतिबा चा डोंगर दिसत होता. जोतिबाचे रविवारचे खेटे सुरु होते. खेटे वाल्यांना नजर अंदाज करून देव जोतिबा जणू पिपंळवृक्षा च्या कठड्या वर उभा राहून या गुरु शिष्यांचा हा कौटुंबिक सोहळा जणू खिडकीत डोकावून पाहत असावा.
या रम्य सोहळ्याला उपस्थित गुरु शिष्य याप्रमाणे. विश्वास काटकर, बळीराम काटकर,(पोहा ळे ) डॉ. प्राचार्य विलास पोवार, विलास कुंभार,(वडणगे ), रघुनाथ कळके.बिल्डिंग कॉन्ट्रक्टर, विष्णू थोरबोले ( कुशीरे ), शिवाजी पाटील , भुयेवाडी, तुकाराम साळोखे, महीपती साळोखे, गणपती बोस्वाटे, (पोहाळे )श्रीमती मोहिनी मोरे, प्राचार्य व्ही आर भोसले, डॉ. विलास मोरे, डॉ. मधुरा मोरे,आणि जेष्ठ पोरांचे कुटुंबीय.
----------------------------------

