मोठा भाऊ छोटा भाऊ हा वाद जरा बाजूला ठेऊ. फक्त विकासाचे गीत गाऊ. भाजपाने भूमिका बदलायला हवी.

Kolhapur news
By -

 

        


        कोल्हापूर न्यूज  /  वि.रा.भोसले


महानगरपालिकेत महायुती ची सत्ता आली. महापौर पदासाठी तेथे एक फॉर्मुला ठरला. युतीतील ज्या पक्षाचे उमेदवार जास्त त्यांचा महापौर. हे सूत्र सगळीकडे मान्य झाले. काहींना सत्तेचा मोह आवरत नाही. बुफे पद्धतीच्या पार्टीत आपल्याला हवे ते प्रत्येक जण ताटात वाढून घेतो. बसायला जागा मिळाली तर ठीक, नाहीतर उभे राहून जेवतो. याला परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणतात. यथेच्छ भोजन झाल्यावर आईसक्रीम पण खावेसे वाटते. वास्तविक भोजना नंतर ते डॉक्टरांनी वर्ज्य मानलेले असते. उदरभरण हा फक्त हेतू नसतो. खाल्लेले पचले पण पाहिजे. त्यासाठी उदरात उष्णता ऊर्जाच हवी असते.


    हे एवढं सांगण्याची गरज का निर्माण झाली. तर युतीच्या घटक पक्षात नेमकी हीच स्तिथी आहे.उदरभरण होऊनही अजीर्नाला आमंत्रण देणे भाजपा ने थांबवावे. एका पेक्षा एक चाणक्य या पक्षात असतांना सत्तेची भूक भाग वण्यासाठी  पळापळ करणाऱ्या जिल्हा परिषदेतील उमेदवारांना आणि त्यांच्या मागे उभे राहून डीवचणाऱ्या आमदारांना  हा बलाढ्य पक्ष का थांबवू शकत नाही?फार लांब जायला नको. परभणी, भिवंडी, येथील उदाहरणे पुरेशी आहेत.जनतेने युतीवर विश्वास टाकला आहे तो असल्या भानगडी करण्यासाठी नाही तर विकासातून गोर गरीब, कष्टकरी यांच्या हाताला काम मिळावे व पोटाला चार घास मिळावेत. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात हमी भाव मिळावेत व त्याच्या वर्षभराच्या काबाड कष्टातून काढलेले कांदे, बटाटे, टोमॅटो, रस्त्यावर ओतून टाकण्याची वेळ येऊ नये म्हणून. दूध नासले म्हणून रस्त्यावर जरूर ओता पण खपले नाही रस्त्यावर म्हणून ओतणे म्हणजे उत्पादकांच्या नशिबाने मांडलेली थट्टाच होय.


    त्यासाठी भाजपासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाने गल्लीतले हे रड्डीचे डाव थांबवावेत.मग तो कोणी चंद्रकांत असो नाहीतर रवींद्र असो. त्यांचे स्वतःचे बळ कांही नाही. देवेंद्राकडून, नरेंद्राकडून मिळालेली उसनी अस्त्रे त्यांचे कडे आहेत.


   बॉलिऊड चा सुपर स्टार राजकुमार यांचा एक संवाद बरेच सांगून जातो.व्हिलन च्या साथीदाराने चाकू काढला तेंव्हा राजकुमार ने त्याला दम दिला." फेंक दो यह छुरी, हातको लग जाय तो खून निकल जाता है "


वक्त चित्रपटातील हा संवाद अगदी साधाच होता पण त्यातला दम भारी होता.आजही तो तितकाच  लोकप्रिय आहे.भाजपातील तत्सम चाकूगिरीला तो  चपलख लागू पडतो.रवींद्र चव्हाण यांच्या स्व. विलासराव देशमुख यांच्यावरील एका वाक्यामुळे लातूर हातचे गेले.


 आता थोडं कोल्हापूर कडे येऊ.

सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आपली स्वतःची ताकद महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेत सुद्धा दाखवली आहे. ते स्वयंभु नेतृत्व आहे. उसने नाही.राष्ट्रवादी ला मोठा भाऊ म्हणून त्यांनी साद घातली आहे. ''घड्याळ' आणि 'तुतारी' दोन्हीना 'हाताचे' इशारे सुरु आहेत. हसन मुश्रीफ हे सुद्धा स्वयंभू नेते आहेत.


   विकासाचे राजकारण हाच भाजपाचा राजदंड राहिला पाहिजे. लोक शाही त्यावरच लुब्ध आहे. तेंव्हा गल्लीतल्यांची लुडबुड थांबली पाहिजे. कोल्हापूर ची भिवंडी होऊ नये इतकेच.म्हणून 'मोठा भाऊ छोटा भाऊ जरा बाजूला ठेऊ आणि फक्त विकासाचे गीत गाऊ 'हीच राजनीती या प्रतिष्ठित पक्षाने वापरावी हीच अपेक्षा.


            ------------------------