कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य पेन्शन ग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त पेंशन पिडीत यांच्या न्याय व रास्त मागणीसाठी गेली दोन वर्ष सातत्याने संघटना रस्त्यावरची लढाई लढत आहे. मयत कर्मचारी कुटुंबीय व सेवानिवृत्त कर्मचारी यांची होणारी हेळसांड यांची कैफियत मांडण्यासाठी श्रद्धांजली अर्पण आंदोलन दि. 5 मार्च 2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ जुनी पेन्शन लागू करावी. नवीन पेन्शन योजना शिक्षक क्षेत्रातूनच हद्दपार करावी. सुप्रीम कोर्टामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त बांधवांच्या जुन्या पेन्शन योजने करिता सकारात्मक शपथपत्र द्यावे. नागपूर खंडपीठाच्या शंभर टक्के अनुदानित शाळेतील 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित तुकडी वरील कर्मचाऱ्यांना तात्काळ जुन्या पेन्शनचा लाभ देण्यात यावा. उपदान नियुक्ती दिनांक ग्राह्य करून देण्यात यावे या प्रमुख मागणी करिता सातत्याने मुंबई नागपूर या ठिकाणी आंदोलने केली आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी याकरिता सुद्धा आंदोलन केले आहे. पण शासनाने अद्याप पर्यंत कोणतीही दखल घेतली नाही.
सेवेत असताना कर्मचारी मृत पावल्यानंतर कुटुंबीयांना जुनी पेन्शन पण सेवानिवृत्तीनंतर एक रुपयाही पेन्शन नाही. याचाच अर्थ असा आहे की सेवानिवृत्तीनंतर नंतर मयत झालेल्या कुटुंबांची शासनाला कोणतीही फिकीर नाही. सुरुवातीच्या काळात आठ दहा वर्षे विनाअनुदानित सेवा करून सेवानिवृत्त बांधवांच्याकडे जाणीवपूर्वक शासन दुर्लक्ष करीत आहे. नवीन पेन्शन योजनेचा शासन निर्णय 2010 साली पूर्वलक्षी प्रभावाने काढून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या वर अन्याय केला आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीनंतर भाजीपाला विकणे, रिक्षा ड्रायव्हर, सिक्युरिटी गार्ड ची कामे नाइलाजास्तव उपजीविकेसाठी करावी लागत आहेत. अशा निष्ठुर शासनाला धडा शिकवण्यासाठी, विना पेन्शन मयत झालेल्या कर्मचाऱ्यांची माफी मागण्यासाठी श्रद्धांजली अर्पण आंदोलन करण्यासाठी हजारो बांधव मुंबई येथे आझाद मैदानात एकत्र येणार आहेत. कुटुंबीयांच्या उपस्थितीत मयत कर्मचाऱ्यांच्या प्रतिमेचे पूजन विधिवत केले जाणार असून सेवानिवृत्त झालेले बांधव यांचीही यादी तयार करून माहिती वजा पुस्तक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांना दिले जाणार आहे. सर्वांनाच जुनी पेन्शन भलेही टप्प्याटप्प्याने मिळालीच पाहिजे याकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 2005 पूर्वी नियुक्त, एनपीएस धारक शिक्षक, टप्पा अनुदानावरील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील विविध संघटनेने एक दिवशी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिलेला अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर यांनी दिली.
आपल्या हक्काची पेन्शन मिळण्यासाठी सर्व पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान मुंबई येथे येण्याचे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्षांनी केले आहे.
--------------------------

