कोल्हापूर न्यूज नेटवर्क
रविवारी टी 20 वर्ल्ड कप आपण जिंकणार.खरंच ? हो अगदी खरं.कोणी भविष्य वर्तवलं आहे का?
भविष्य? इथंच चुकतंय तुमचं. प्रत्येक गोष्टीत भविष्य सांगणारा ज्योतिषी शोधायचा.आत्मविश्वास आणि श्रद्धा नावाची एक सुप्त ऊर्जा आपल्यात असते.
ती जागवली पाहिजे. सूर्याच्या टीम ने ती जागवली आहे. म्हणूनच रविवारी आपण जिंकणार.
कांही कळलं नाही.
जरा गेल्या खेळांचा आढावा घेऊ म्हणजे कळेल.
दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने आपल्याला घाम फोडला होता. स्टेडियम मधले प्रेक्षक आणि देशातले टीव्ही पाहणारे सर्वच क्रिकेट प्रेमी हवालदिल झाले होते. मैदानातील खेळाडू मात्र अत्यंत आत्मविश्वासाने सामना जिंकायचाच म्हणून खेळत होते.
धुवांधार फलंदाजी करणाऱ्या जॅकब बॅथलला सामना जिंकणे अवघड नव्हते. त्याने शतकही ठोकले होते. हार्दिक पांड्या च्या सीमारेषे वरून केलेल्या एका थ्रोने त्याला रन आउट होणे भाग पाडले.
अगदी सीमा रेषेवर अक्षरने घेतलेला तो अप्रतिम झेल आठवा. धावांचा वेग कमी करण्यासाठी बुमराहला गोलंदाजी देऊन सूर्याने कप्तानीतले कौशल्य दाखवले आहे. शेवटच्या तीन षटकात आपल्या संघाने सामना फिरवला आहे हे लक्षात घ्या.
CRICKET IS A GAME OF CHANCE
असे म्हटले जाते. तो चान्स घ्यावा लागतो.
थोडे मागे जाऊया.
अगदी नवख्या संघांनी सुद्धा आपल्याला जेव्हा जेरीस आणले तेव्हा सूर्यकुमार,ईशान किशन आणि संजू सॅमसन यांनी आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने खेळी करून प्रत्येक वेळी विजय मिळवले.
साउथ आफ्रिकेने आपला 76 धावांनी पराभव केला. आपण खाडकन जागे झालो. त्याच साऊथ आफ्रिकेला न्युझीलँड ने सात विकेट ने हरवले.
आता आलं का लक्षात ?
आपल्या संघाकडे उत्तम फलंदाज व गोलंदाज आहेत. मन स्थिर ठेवून आत्मविश्वासाने सामना जिंकायचेच म्हणून खेळले तर विजय निश्चित आहे. संजू सॅमसन ने सामना जिंकल्यावर येशूला प्रणम केला होता.शतक ठोकल्यानंतर विराट कोहलीने एकदा आपला ताईत मस्तकी लावला होता. याला श्रद्धा म्हणतात.
प्रत्येक वेळी भविष्य वेत्ता शोधत बसायचे नसते. होम हवन अभिषेक वगैरेची सुद्धा गरज नाही. थोडा गोंधळून गेलेला आमचा अभिषेक शर्मा सुद्धा कदाचित रविवारी धावांचा अभिषेक करेल.
आपला संघ उत्तम आहे.कोट्यावधि भारतीय संघाला शुभेच्छा देतील. संघातील प्रत्येक खेळाडू आत्मविश्वास आणि जबाबदारीने खेळेल. त्यांच्यातील श्रद्धा त्यांना ऊर्जा देत राहील.
म्हणूनच रविवारी टी 20 वर्ल्ड कप आपण जिंकणार. सूर्याच्या संघाचा जयजयकार होणार.
--------------------------

