एकेकाळी दुष्काळग्रस्त भूमी असलेल्या पिंपळगावची कन्या बनली भूमि अभिलेख खात्याची अधिकारी.

Kolhapur news
By -

                


               




           कोल्हापूर न्यूज नेटवर्क   



गावाचे नाव पिंपळगाव.ता. कागल. एकेकाळी पाण्यासाठी धावाधाव करणाऱ्या या गावाला कॅनॉलचे पाणी मिळाले. हिरवी गार नसली तरी शिवारे पाण्याने भिजली आणि कोरड्या गवताच्या गड्ड्या च्या ठिकाणी पिके डोलू लागली.


     याच  ग्रामीण भागातली कन्या साक्षी ताशीलदार आज एम पी एस सी च्या स्पर्धेतून भूमी अभिलेख खात्याची उच्च स्तरीय अधिकारी बनली आहे. भूकरमापक  (Land Surveyor ) बनली आहे.


      मुळातच हुशार असल्याने तिच्या आई वडिलांनी तिला खुप शिकवायचे ठरवून मुरगूड येथील न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये दाखल केले. तेरा किलोमीटर अंतरावरील  शाळेत ते  कन्येला बाईकवरून मध्ये बसवून घेऊन आले.एका मागोमाग एक बक्षीसे मिळणाऱ्या या कन्येने येथेच बोर्डाची दहावी परीक्षा दिली आणि 94 टक्के  गुणांनी ती उत्तीर्ण झाली.शाळेतल्या शिक्षकांनी तिच्या आई वडिलांना हसत हसत सांगीलते साक्षी कलेक्टर सुद्धा होईल.


     एवढे ऐकल्यावर तिने ठरवले की आपण मोठे सरकारी अधिकारी होऊनच दाखवायचे. आता मागे वळून पाहायचेच नाही असे ठरवून तिने कोल्हापूर येथे उच्च माध्यमिक शिक्षण प्रथम श्रेणी त पूर्ण केले.  पुढे सिव्हिल इंजिनिअरची पदवी परीक्षाही दिली.पंखात आता बळ आले होते.


 उत्तम इंग्रजी,सुरेख हस्ताक्षर, बुलंद वर्तृत्व, या गुणांवर तिने शाळा, कॉलेज च्या सर्व अध्यापकांची मने जिंकली . मिळेल तितके स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन घेत राहिली.घरा पासून दूर राहून रोज 10 ते 12 तास अभ्यासिकेत घालवले.


स्कुटीच्या चाका बरोबर स्पर्धा परीक्षेची विचार चक्रे तिच्या डोक्यात सतत फिरत होती. RRB आणि SBI च्या प्राथमिक परीक्षा मध्ये ती उत्तीर्ण झाली पण मेन्स मध्ये अयशस्वी ठरली.आय ए एस. आय पी एस चे स्वप्न  उराशी बाळगुन साक्षी गरुडा प्रमाणे आकाशाचा साक्षीदार होऊ इच्छित आहे.


    भूमी अभिलेखची परीक्षा ती पहिल्याच प्रयत्नात  सर्वोच्च श्रेणित उत्तीर्ण झाली.भूकरमापक पदी तिची निवड झाली आहे. अजूनही थांबून चालायचं नाही म्हणून मिळेल त्या वेळेत अभ्यास करत रहाते.बालपणी पिंपळगांवच्या  जमिनीतल्या भेगा तिने पाहिल्या होत्या.त्या भेगात पाय अडकून अनेक वेळा पडली आहे. आता धावायचं  पण पडायचं नाही असं तिनं  ठरवलं आहे.


   कुटुंबा पासून दूर राहून तिने प्रण केलाय एक दिवस गावाच्या वेशीवर माझं भारतीय सेवेतील अधिकारी म्हणून स्वागत होईल. तिरंग्याची शान तिला राखायची आहे.शेतात राबणाऱ्या  आई बाबांना एक सलाम ठोकायचा आहे. आज तीही शेतीशीच निगडीत असे पद भूषवत आहे.


    देर है अंधेर नही म्हणून  आकांक्षे चे पंख फडफडवत ग्रामीण कन्या साक्षी  अनेक मुलींचे प्रेरणा स्थान बनून  राहिली आहे.



           -----------------------