२०२९ ची निवडणूक अनेकांच्या राजकीय अस्तित्वाची परीक्षा असणार आहे.

Kolhapur news
By -


               


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


कधी कधी एखाद्या नेत्याचा राजकीय प्रवास हा सरळ रेषेत चालत नाही…तो वळणं घेतो, धक्के खातो… आणि पुन्हा नव्याने उभा राहतो.कोल्हापूरच्या राजकारणात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेलं नाव म्हणजे...समरजितसिंह घाटगे. 


घाटगे घराण्याची परंपरा, सामाजिक वारसा आणि सहकार क्षेत्रातील भक्कम पायाभूत काम यामुळे त्यांची ओळख केवळ राजकीय नाही—तर एक सामाजिक नेतृत्व म्हणूनही तयार झाली आहे.पण प्रश्न इथे संपत नाही…खरी गोष्ट सुरू होते त्यांच्या राजकीय “timing” पासून.


२०१६ मध्ये भाजपमधून राजकीय प्रवासाची सुरुवात…२०१९ मध्ये अपक्ष म्हणून मैदानात उतरणं…आणि २०२४ मध्ये  शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवणं—हा प्रवास फक्त पक्ष बदलण्याचा नाही…तर संधी, संघर्ष आणि समीकरणांचा आहे.


आता ८ एप्रिलला पुन्हा एकदा भाजपमध्ये “घरवापसी”…आणि त्याच क्षणी कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ.कारण समोर आहेत कागलचे विद्यमान आमदार व मंत्री— हसन मुश्रीफ, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांत कागलमध्ये आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.


पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल…प्रत्येक मतदारसंघात एक “फॅक्टर” असतो—

तो म्हणजे anti-incumbency…

म्हणजेच प्रस्थापित उमेदवाराविरोधातील मतांची ताकद.


समरजित राजेंना मिळालेली मतं…

ती पूर्णपणे त्यांची “core vote bank” आहे का ?

की त्यात मोठा वाटा हा मुश्रीफांविरोधातील मतांचा आहे?


इतिहासाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—

जेव्हा जेव्हा कागलमध्ये “एकास एक” लढत झाली…

तेव्हा मुश्रीफ अडचणीत आले किंवा विजयाचं अंतर कमी झालं.

पण राजकारण हे केवळ लढाई नसतं—

ती रणनीती असते.आणि इथेच मुश्रीफांचा अनुभव पुढे येतो.सहा पैकी पाच निवडणुकांमध्ये त्यांनी विरोधकांमध्ये विभागणी केली…

कधी दाेन घाटगे मध्ये फूट…

कधी मंडलिक आणि घाटगे असे दोन उमेदवार…आणि त्यातून स्वतःचा मार्ग मोकळा केला.

आता प्रश्न असा आहे—

भाजपमध्ये समरजित राजेंच्या पुनरागमनामुळे हीच परिस्थिती पुन्हा तयार होणार का?

कारण महायुतीमध्ये आता स्पष्ट दोन प्रवाह दिसतात—

एकीकडे घाटगे…

तर दुसरीकडे इतर स्थानिक गट.

संजयबाबा घाटगे आणि समरजित राजे यांचे संबंध…तालुक्याला माहित असलेलं वास्तव आहेत.एकाच पक्षात असले तरी, ते दीर्घकाळ एकत्र टिकतील का?आणि टिकले तरी एकमेकांना मनापासून साथ देतील का?

हे मोठं प्रश्नचिन्ह आहे.

त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मंडलिक गट विरुद्ध मुश्रीफ-घाटगे असा संघर्ष झालेला आहे.म्हणजेच पुढच्या विधानसभा निवडणुकीत

वीरेंद्र मंडलिक यांची एंट्रीही जवळपास निश्चित मानली जाते.

म्हणजेच पुढचा सामना “सरळ” राहणार नाही—तो होणार आहे त्रिकोणी… किंवा कदाचित बहुकोनी.आणि अशा वेळी सर्वात जास्त फायदा कुणाला होतो? तो सहसा त्या नेत्याला—

जो आधीपासून “स्टँडिंग” मध्ये आहे.

म्हणजेच पुन्हा एकदा मुश्रीफ फायद्यात राहू शकतात…मग महायुती एकत्र लढो किंवा वेगवेगळे.याच सगळ्यात अजून एक सूक्ष्म मुद्दा आहे—

भाजपच्या आतली “perception”(धारणा) 


२०१४ मध्ये सत्तेत असताना राजेंना पुणे म्हाडाचं अध्यक्षपद मिळालं होतं…म्हणजे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता.

पण त्यानंतर ऐनवेळी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय…हा काही भाजप नेत्यांच्या मनात अजूनही खटकतोय, अशी चर्चा आहे.

कारण राजकारणात एक गोष्ट महत्त्वाची असते - निष्ठा की संधी ?

काही जणांना वाटतं—राजेंना पक्षापेक्षा आमदारकी अधिक महत्त्वाची वाटते.आणि हीच गोष्ट त्यांच्या भविष्यासाठी अडथळा ठरू शकते.म्हणूनच आता खरी उत्सुकता एका गोष्टीची आहे—

भाजप राजेंचं “पुनर्वसन” कसं करतं?त्यांना पुढे नेणार…की फक्त एक “राजकीय चाल” म्हणून वापरणार? कारण २०२९ ही फक्त निवडणूक नाही…

ती अनेकांच्या राजकीय अस्तित्वाची परीक्षा असणार आहे.

       - Vishayhaard


        ----------------------------