कोल्हापूर न्यूज नेटवर्क
निपाणी : रासाई शेंडूर येथे दि.७ मे २०२६ रोजी कृषी विज्ञान केंद्र, तुकानट्टी व रयत संघटना, रासाई शेंडूर यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पीक नियोजन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. आर. एम. पाटील, संस्थापक अध्यक्ष- बेळगाव जिल्हा एकात्मिक विकास संस्था (बर्ड्स), कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख वैज्ञानिक व समन्वयक-. दत्ता म्हेत्रे, बुधिहाळ येथील प्रगतीशील शेतकरी सुरेश पाटील व सौंदलगा येथील प्रगतीशील शेतकरी संजय शिंत्रे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आर. एम. पाटील हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना दत्ता म्हेत्रे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी गावातील प्रमुख पिकांपैकी ज्वारी, भुईमूग, भात व तूर या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच एरंडी, कांदा, देशी मिरची यासारखी नगदी पीके यावर भर द्यावा. शेतीची उत्पादकता कमी होण्यासाठी अनेक कारणे आहेत, यावर विचार करुन शेतकऱ्यांनी शेतातील कर्ब कसा वाढेल यासाठी खतांचा योग्य वापर, घरच्या घरी निविष्ठा तयार करुन त्याचा शेतामध्ये वापर, बांधावरील झाडांचे महत्व इ. बाबत मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश देसाई यांनी एकात्मिक शेतीचा आपला अनुभव विषद केला. शेतकऱ्यांनी आपला उत्पादित माल व्यापाऱ्यांना न विकता त्यावर प्राथमिक प्रक्रिया करुन त्याचे मुल्य वाढविले पाहीजे. सध्या शेतीसाठी दोन बैल सांभाळणे परवडत नाही, त्यासाठी त्यानी एका बैलाच्या आधारे २.५ एकर शेती कशी केली जाते, त्यासाठी तयार केलेली नाविण्यपूर्ण अवजारे याची माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांनी नवनविन तंत्रज्ञान अवगत करुन सुधारित पध्दतीने शेती करण्याची व त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची मदत घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी संजय शिंत्रे यांनी मार्गदर्शन करतांना पारंपारिक पिकांबरोबरच पर्यायी पिकांची निवड करुन त्याची सामुहिक पध्दतीने शेती करण्याची गरज व महत्व विषद केले.
या चर्चासत्रामध्ये प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर शेतकऱ्यांचा मागील वर्षातील पीक लागवडीचा अनुभव व येत्या खरीप हंगामामध्ये कोणती पीके घेता येतील यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पारंपारिक पिके घेतांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. तसेच आंबा लागवड, फुलशेती, पशुपालन, पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या व त्यावर कोणती उपाययोजना करता येईल याबाबत उपस्थित तज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड करुन येत्या खरीप हंगामासाठी पीक आराखडा तयार करुन कृषी विज्ञान केंद्रास सादर करावा असे ठरले.
अध्यक्षीय भाषणामध्ये आर. एम. पाटील यांनी शेतकऱ्यांमध्ये नेटवर्क तयार करण्याची गरज असल्याचे सांगितले. गावातील निवडलेल्या शेतकऱ्यांनी प्रत्येकी ४ शेतकऱ्यांना तयार करावे, जेणेकरुन गावामध्ये ४० ते ५० शेतकऱ्यांचा एक समुह तयार होईल. या समुहाच्या वतीने पीक लागवड ते पीक पश्चात प्रक्रिया व विक्री यासाठीचे नियोजन करता येईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन बाळू खराडे यानी केले, तर स्वागत शिवाजी वाडेकर यांनी केले. प्रास्ताविक सेवा संस्थेचे सचिव अशोक तोडकर यांनी केले व आभार मारुती लाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रयत संघटनेच्या गावातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या चर्चासत्रासाठी शेंडूर, गोंदिकुप्पी येथील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
********************

