कोल्हापूर न्यूज / वि. रा. भाेसले
छत्रपती शिवाजी महाराज की.... जय, छ. संभाजी महाराज की....भारत माता की.... जय. अशा घोषणा बबन बारदेसकर यांच्या दमदार आवाजातून ऐकाव्यात.त्यांच्या घोषणा घुमल्या की पडवीत पेंगत असलेला पांडबा सुद्धा खाडकन जागा व्हायचा आणि हात वर करून "जय "म्हणून गर्जायचा.
गेली 32 वर्षे मुरगूड नगर परिषदेच्या सेवेत असलेले बबन उर्फ फ्रान्सीस अनंत बारदेसकर निवृत्त होत आहेत. कॉम्रेड ही त्यांची बिरुदावली त्यांना त्यांच्या वडिलांपासून च मिळाली. वडील अनंत उर्फ आंता बारदेसकर हे सुद्धा नेहमी कुठल्या ना कुठल्या चळवळीत असायचे.सायकल हे त्यांचे आवडीचे वाहन. त्यामुळे व्यायाम व्हायचाच पण खर्चात मोठी काट कसर सुद्धा व्हायची.
बबन बारदेसकर यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवला आहे. मुरगूड शहर, स्वच्छ शहर, असे म्हणत घंटा गाडी आजही सकाळी फिरताना दिसते. शहराला दोन वेळा दिल्ली दरबारीं स्वच्छतेचे पारितोषिक मिळाले आहे. याचे पुष्कळसे श्रेय बबनरावाना जाते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मुकादम म्हणून ते काम करत होते. कर्मचाऱ्यांना केबळ आदेश देत ते कधी बसले नाहीत. त्यांच्या अडचणी आणि दुःखे त्यांनी आपली मानली. त्यांना सतत प्रोत्साहन तर दिलेच पण त्यांच्या चांगल्या सामाजिक कार्याचा त्यांनी गौरव केला. फोटो सह त्यांच्या विधायक कार्याची माहिती माध्यमाना देत राहिले.त्यांना दिल्लीला ही घेऊन गेले.
कोरोना काळात तर जीवावर उदार होऊन त्यांनी सेवा कार्य बजावले. कोरोना इतका निर्दयी होता की रुग्णाच्या नातेवाईकांना सुद्धा तो जवळ येऊ देत नव्हता.
या साथीत शेवटचा श्वास घेतलेल्या रुग्णांचे दहन बबन बारदेसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. शेवटची भेट सुद्धा घेता आली नाही असे नातेवाईक त्यांना देवदूत म्हणायचे. नातेवाईकांनी नंतरचे सारे संस्कार मृतात्म्याच्या फोटो बरोबर केले. अशा जटील सेवा कार्यात बबनराव कधीच मागे राहिले नाहीत.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे प्रेरणा स्थान आहे.डॉ. आंबेडकर यांची जयंती तर उत्साहाने साजरी व्हायचीच पण आठवडाभर त्यांच्या नावाने चालणारी व्याख्यानमाला सुरु करण्यात त्यांचा पुढाकार असायचा. सामाजिक काम आणि आपला देश यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे.. त्यामुळे त्यांच्या बारदेसकर या नावाला कामदेसकर अशी बिरुदावली सुद्धा जोडावी लागेल.
ते जरी आज निवृत्त झाले असले तरी विधायक कार्याचे, राष्ट्रभक्ती चे विझत चाललेले निखारे प्रफुल्लित करायला बबन बारदेसकरांच्या गगनभेदी घोषणांचीच आज गरज आहे.
--------------------------

