कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
अरविंद मामा : ताई, रजनी कुठे आहे? पेढे घेऊन आलोय तिला. म्हंटलं आज रविवार आहे. पुन्हा उद्यापासून आमचा कामाचा आठवडा सुरु.
ताई :,, रजनी, मामा आलेत तुझं अभिनंदन करायला. त्यांना नमस्कार कर.
रजनी येते, मामांना नमस्कार करते.
मामा : तायडे, छान मार्क काढलेस, दहावीला 95टक्के म्हणजे भारीच. आमच्या वेळी 70टक्के म्हणजे शेंडी दांडी असायची.
रजनी : हे सगळं तुम्हां सर्वांच्या पाठिंब्या मुळे आणि , प्रोत्साहना मुळे.
मामा : आता पुढे काय? डॉक्टर की इंजिनिअर? म्हणजे NEET की JEE?
रजनी : यातलं मी कांही करणार नाही. NEET नाही की JEE नाही.
मामा : म्हणजे? तू काय करायचं ठरवलं आहेस? देशातील लाखो विदयार्थी हेच करतात. केवढ्या मोठया पानभर जाहिराती असतात NEET आणि JEE साठी.
रजनी : होय मामा, ही त्या खाजगी क्लास वाल्यांना चरायला सोडलेली कुरणं आहेत.
मामा : काय सांगतेस काय? केवढ्या मोठ्या जाहिराती असतात. उत्तीर्ण विदयार्थ्यांचे फोटो, त्यांची टक्केवारी. केवढी मोठाली होर्डिंगज असतात. टॉप ला ठळक लिहिलेलं वाक्य. डॉक्टर आणि इंजिनियर तयार करण्याची फॅक्टरी वगैरे.
रजनी : अगदी बरोबर मामा आणि इथेच सगळे पालक फसतात. लाखो रुपये फी भरून आपल्या मुलांना NEET आणि JEE च्या क्लासला पाठवतात. शंभरात पाच दहा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. त्यांचेच फोटो लावले जातात. बाकीचे 90 विद्यार्थी निराश होऊन घरी परततात. या 90 मुलांचे क्लास वाल्यांना काहीही देणे घेणे नसते. त्यांच्या तुंबड्या भरल्या की झालं.
मामा : बापरे, रजू, केवढा अभ्यास केला आहेस तू याचा! एवढ्या लहान वयात तू केवढं भयानक सत्य मांडलं आहेस !
रजू : मामा, मी ही सगळी माहिती माझ्या सरांनी च मला समजावून सांगितली आहे.रजू सविस्तर सांगत होती आणि मामा हातांच्या पंजावर हनुवटी टेकून आश्चर्याने सारे ऐकत होता.
NEET म्हणजे National Eligibility cum Entrance Test.ही टेस्ट सर्व शासकीय तथा अशासकीय मेडिकल मेडिकल कॉलेज च्या प्रवेशा साठी असते. यात MBBS, BDS, AYUSH, BAMS वगैरे सर्व कोर्सेस आले. NEET चे पेपर NTA म्हणजे National Testing Agency या केंद्रीय बोर्डा मार्फत काढले जातात.
NEET च्या खाजगी क्लासेसना लाखो रुपये घालावे लागतातच शिवाय पास झाल्या नंतर खाजगी मेडिकल कॉलेजची लाखो रुपयांची फी भरावी लागतेच. शासकीय मध्ये थोडी कमी असेल एवढेच. हा गरीबांचा खेळ नाही. नोकरदार कर्जे काढून मुलांच्या साठी पैसे घालतील व रिटायर्ड होई पर्यंत ते कर्ज फेडत बसतील. म्हणजे एक वजा एक शून्य हे त्यांच्या मिळकतीचे गणित असेल.
JEE चे सुद्धा तसेच.Joint Entrance Exam. असं या परीक्षेला म्हणतात. सर्व Technical, व Engineering कोर्सेस साठी ही परीक्षा असते.रजू चे मामा हे सर्व उत्सुकतेने ऐकत होते. केवढा अभ्यास केलाय ह्या दहावी उत्तीर्ण मुलीने. हे पालकांना सुद्धा समजणें आवश्यक आहे.पालकांच्या अज्ञानाचा फायदा हे खाजगी क्लासेस वाले घेतात.NEET चे पेपर फुटले आणि आरोपी गजाआड गेले तेंव्हा हे बिंग फुटले.
शासनाच्या केंद्रीय बोर्डाचा यात प्रामाणिक उद्देश असतो . गुणवत्ते नुसार मुलांना प्रवेश मिळावेत. तसे ते मिळत नाहीत हीच शोकांतिका आहे.बाजारात सर्व पुस्तके विकत मिळतात. कनिष्ठ महाविद्यालयातील तज्ञ् प्राध्यापक मोफत किंवा अत्यल्प फी मध्ये ही तयारी करून घेऊ शकतात. दुर्दैव असे की मुले तिथे नसतातच. फक्त त्यांचे दाखलेच तिथे असतात. मुलं या आलिशान खाजगी क्लासेस मध्ये असतात. त्यांना बस ऐवजी विमानाने प्रवास करायचा असतो.त्यात पैसा आणि धोका सुद्धा तेवढाच मोठा असतो.
रजूच्या मामाने कांदे पोहे खाऊन निरोप घेतला. उद्या पुन्हा नोकरीवर जायचं आहे. अरविंद मामा च्या डोक्यात एकच वाक्य घुमत होते.NEET आणि JEE म्हणजे खाजगी क्लासेस वाल्यांना चरायला सोडलेली कुरणे. आता सगळेच कुठे बरे गायब झाले? वर्तमान पत्राचं पहिलं पान यांचच असायचं.
*******************

