कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखलीचे माजी सरपंच कै.रावसाहेब भोसले यांच्या ३१ व्या पुण्यतिथी निमित्त फोटो पूजन चिखलीचे प्रशासक सरपंच युवराज कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नसरुद्दीन नाईक , राजाराम देवडकर अण्णासाहेब शिरगुप्पे, माजी उपसरपंच विजय घस्ती, कृष्णा डवरी, विवेक चाबुकस्वार , रघुनाथ लोकरे सर, अजित पिसाळ ,जयकुमार शिंदे यांच्यासह इतर उपस्थित होते.
कै. रावसाहेब भोसले यांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा वारसा पुढील पिढीही समर्थपणे पुढे नेत आहे
नानीबाई चिखली गावच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे माजी सरपंच कै. रावसाहेब भोसले हे गावच्या इतिहासातील एक आदर्श आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. दीर्घकाळ सरपंचपदाची धुरा सांभाळताना त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले.
गोरगरिबांच्या मदतीला कोणत्याही अपेक्षेशिवाय धावून जाणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणे ही त्यांची कार्यपद्धती होती. त्यामुळे ते केवळ सरपंच नव्हते, तर गावकऱ्यांचे आधारवड बनले होते.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली असल्याने गावात त्यांच्याबद्दल विशेष आदरभाव निर्माण झाला. आजही गावातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण पिढी त्यांच्या कार्याची आठवण अभिमानाने सांगते.
कै. रावसाहेब भोसले यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने स्थापन झालेली पतसंस्था आजही अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. ही संस्था त्यांच्या प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि समाजसेवेच्या वारशाचे प्रतीक मानली जाते.तसेच आर.बी.सहकारी उद्योग समूहातील रावसाहेब भोसले दूध संस्था,अनुराधा भोराले महिला दूध संस्था, श्री स्वामी समर्थ संस्था ही चिखलीकरांच्या सेवेत यशस्वीरित्या कार्यरत आहेत.
त्यांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा वारसा पुढील पिढीही समर्थपणे पुढे नेत आहे. त्यांच्या स्नुषा शिवानी विजयसिंह भोसले या चिखली जिल्हा परिषद मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे. तसेच त्यांचे चिरंजीव विजयसिंह भोसले हे परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असून सार्वजनिक सेवाक्षेत्रात योगदान देत आहेत.
कै. रावसाहेब भोसले यांनी आयुष्यभर जपलेली लोकसेवा, विकासदृष्टी आणि समाजहिताची तळमळ हीच त्यांची खरी ओळख आहे.
नानीबाई चिखलीचा इतिहास लिहिताना त्यांच्या योगदानाचा उल्लेख सुवर्णाक्षरांनी करावा लागेल. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत राहील आणि गावकऱ्यांच्या हृदयात त्यांचे स्थान कायम अढळ राहील.
-------------------------


